जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी :- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बाल विवाह निर्मूलन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे हस्ते उद्घाटन - दैनिक शिवस्वराज्य

जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी :- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बाल विवाह निर्मूलन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे हस्ते उद्घाटन

 

  समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी                          सोलापूर दि.17 :- बाल विवाहामुळे मुला-मुलींचे मानसिक व शारीरिक शोषण होत असते. बालविवाह करणे अत्यंत घृणास्पद असून शासनानेही बालविवाह प्रतिबंधासाठी कायदे केले असून त्यानुसार असे विवाह करण्यास पुढाकार घेणारे कायद्याने गुन्हेगार आहेत. त्यामुळे महिला व बाल विकास विभागामार्फत बालविवाह निर्मूलनासाठी आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने आत्मसात करून याबाबत समाजातील सर्व घटकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

        जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात बाल विवाह निर्मुलन दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महिला व बाल विकास कार्यालय, एस बी सी - 3 तसेच युनिसेफ  यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते.

     यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जि. प.  बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, एसबीसी - 3 चे संस्थापक निशीत कुमार तसेच मीनाकुमारी यादव, पूजा यादव, सोनिया हांगे, किरण बिलोरे, निलेश सातपुते आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, या प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त महिला उपस्थित आहेत ही एक चांगली बाब आहे. बाल विवाह हा खूपच संवेदनशील विषय आहे. बाल विवाह रोखण्यात घरातील महिला मोठी जबाबदारी पार पाडू शकतात. या प्रशिक्षणातून महिला वर्गाने बाालविवाह  प्रतिबंधासाठी अत्यंत कसोशीने काम करणे व समाजातील शेवटच्या् घटकापर्यंत या अनुषंगाने प्रबोधन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    तसेच मुलींचे बाल विवाह करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुलींचे बाल विवाह करणे म्हणजे त्यांच्यावर कमी वयामध्ये जास्त जबाबदारी टाकणे. या बाल विवाहामुळे मुलींवर शारिरीक आणि मानसिक वाईट परिणाम होतात. त्या करीता सर्व प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेमार्फत दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून बाल विवाह निर्मूलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. ही जनजागृती करत असतांना लोकांना कोवीड लसीकरणाचे देखील महत्व पटवून देऊन लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणले की, बालविवाह रोखण्यासाठी शासनाने कायदा केलेला आहे. परंतु फक्त कायदे करून असे विषय संपत नाहीत. त्याकरीता लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. सर्व प्रशक्षिणार्थींनी प्रथम बालविवाहाची कारणे समजून घेणे गरजेचे आहेत. याची कारणे देखील विविध आहेत. कारण समजल्यानंतरच आपणाला बालविवाह रोखण्यास उपाय योजना करता येतील. त्या करता आपण सर्वांनी गरीब, निरक्षर, अज्ञानी लोकांमध्ये या बाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली पाहीजे. तसेच समाजातील लोकांच मत परिवर्तन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सुचित केले.

             जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉक्टर खोमणे यांनी बालववाह निर्माण होण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बालविवाहास प्रतिबंधासाठी व केल्यास कायद्यानुसार कशा पद्धतीने शिक्षा होऊ शकते याचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

             प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते बाल विवाह निर्मूलन बाबत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रशिक्षणास मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थी विशेषत: महिलावर्ग उपस्थित होता.  

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads