बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू – पोलिसांची जलद कारवाई, दोन आरोपी ताब्यात
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर शहरात काल दुपारी घडलेल्या एका वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खान (वय 21, रा. छोटी बेटावद, जामनेर) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान खान हा काही
कामानिमित्त सकाळी जामनेर शहरात आला होता. दरम्यान, शहरातील एका कॅफेमध्ये काही व्यक्तींशी त्याचा वाद झाला. वाद वाढताच त्याला मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर त्याला बसस्थानकाजवळ नेऊन पुन्हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर तो गंभीर जखमी झाला.सदर तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.
घटनेची गंभीर दखल घेत जामनेर पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण आठ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके आणि LCB (स्थानिक गुन्हे शाखा)ची टीम तयार करून तपासाला गती देण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
परंतु वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे आणि सर्व माहिती मिळाल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जामनेर पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, पोलिस प्रशासन आपले काम काटेकोरपणे करत आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
सध्या शहरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आणि पुढील तपास सुरू आहे

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा