मध्यरात्रीचा थरार ..मोयगाव-पिंपळगाव-भागदरा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीला नागरिकांचा चाप — सरपंच व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपी जेरबंद - दैनिक शिवस्वराज्य

मध्यरात्रीचा थरार ..मोयगाव-पिंपळगाव-भागदरा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीला नागरिकांचा चाप — सरपंच व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपी जेरबंद

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर | दि. ११ ऑगस्ट २०२५
जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे काल मध्यरात्री घरफोडीच्या प्रयत्नात एका चोराला स्थानिक तरुणांनी जीवावरचा पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. ‘चड्डी गँग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोळीचा हा सदस्य असून, परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक सतर्क झाले होते.
गेल्या काही दिवसापासून जामनेर शहरासह तालुक्यात अनेक घरफोड्या आणि धाडसी चोरीच्या घटना घडल्या आहेत. आरोपी अत्यंत शातिर असल्याने त्यांना पकडणे अवघड झाले होते. मागील पंधरा दिवसांपासून मोयगाव, पिंपळगाव, भागदरा, पिंपरखेडा, टाकळी आदी गावांमध्ये ‘चड्डी गँग’चे सदस्य फिरत असल्याची चर्चा होती. हे चोर प्रामुख्याने महिलांच्या, वृद्धांच्या किंवा मुलांच्या घरांना टार्गेट करत होते.

संशयितावर बारीक नजर

दहा-पंधरा दिवसांपासून भागदरा गावात ही टोळी दिसत होती. १० ऑगस्टच्या रात्री भागदरा गावातून फोन आला की “हाफ चड्डी घातलेला चोर फिरतोय.” यानंतर मोयगाव आणि भागदऱ्यातील तरुणांनी रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली. पहाटेच्या सुमारास त्यांना एक संशयित व्यक्ती दिसला. चौकशी केली असता त्याने “शिकार करायला आलो” असा संशयास्पद खुलासा केला.
रात्रीच्या वेळी कोणती शिकार? – या प्रश्नावर संशय वाढल्याने तरुणांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याचा बाप गाडी घेऊन त्याला घेण्यासाठी आला, मात्र गावकऱ्यांनी ओळखले की तो लोन्द्री गावचा रहिवासी आहे. भागदऱ्यात आधीच नागरिकांनी त्याला काठ्यांनी मारल्याने त्याच्या अंगावर मारझोडीच्या खुणा होत्या.मोयगावचे सरपंच महेंद्र सर, लोंधरी गावचे नेते राजमल भागवत आणि पिंपळगाव गोलाईतचे सरपंच संदीप पाटील यांच्या सतर्कतेमुळे आणि तरुणांच्या धाडसामुळे लोढरी येथील कलीम खान आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.पहूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कठोरे यांनी तातडीने पथकासह लोन्द्री गावातून आरोपीला जेरबंद केले. आरोपीला पहूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी आरोपीला पाहण्यासाठी आणि घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात प्रचंड मोठी गर्दी जमली होती. आरोपीचे धुळे आणि नाचनखेडा येथीलही साथीदार असल्याची माहिती मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे.




Previous article
Next article

1 Comments

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads