Blog
स्पर्धक क्रमांक ३७ कल्लाप्पा बंडू गावडे सोलापूर
राजा शिवछत्रपती
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ॥
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
भावभक्तीच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ॥
हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाने ही महाराष्ट्राची पावनभूमी पवित्र झाली आहे. सुमारे तीनशे शतकांच्या परचक्राच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा महाराष्ट्र भूमीला मिळाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबल इच्छाशक्ती, मुत्सुध्दी, रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा विविध गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवरायांनी ‘प्रतिपचंद्ररेखेव वर्धिष्णू’ अशा स्वराज्याची स्थापना केली.
आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने त्यांनी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली . कौशल्य, चातुर्य अणि साहस या गुणांनी त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक शक्ती स्वराज्य स्थापण्यासाठी एकत्रित केल्या त्यामुळे ते आपल्या काळातील युगप्रवर्तक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारीत्र्य साधेपणा, कनवाळूपणा, स्त्रियांबद्दल असणारा भक्तीभाव, त्यांची धार्मिक वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेमध्ये महाराज अवतारी पुरुष असल्याची भावना निर्माण झाली होती कारण महाराजासारखा धर्मनिरेपक्ष राजा या देशात झालाच नाही.
शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबध्दता निर्माण केली, न्यायदानात नि:स्पृहता दाखविली. गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चातापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले. सर्व धर्मांना समान लेखले, गुणवंताचा गौरव केला, साधुसंताचा यथोचित आदर केला, परंतु या सर्वाबरोबरच त्यांनी आपला रयतेची जीवापाड काळजी घेतली. रयतेला आपल्या लेकराप्रमाणे मानणारे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युगपुरुष नव्हते तर मानवतेचे उत्कृष्ट तत्वज्ञान सांगणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे महात्मा होते, वंदनीय थोर पुरुष होते.
महाराजांनी विविध कलांना प्रोत्साहन दिले, अनेकांना लेखनासाठी प्रेरणा मिळाली, राज्यव्यवहारात फारशीचे स्तोम होते त्यासाठी त्यांनी रघुनाथ पंडीत यांच्याकडून ‘राज्य व्यवहार कोश’ तयार करुन घेतला. ‘शिवभारत’ हा काव्यमय संस्कृत ग्रंथ नीलकंठ चतुर्धराची महाभारतावरील ‘नीलकंठी’ नावाची विस्तृत व मार्मिक टिका, भूषण आणि जयराम कवीचे काव्य असे विपुल ग्रंथ लेखन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे जसे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते तसेच अत्यंत सूक्ष्म दृष्टीने राज्यकारभार करणारे प्रजाहितदक्ष राजेही होते. 1673 मध्ये चिपळुणच्या सैन्याधिकारी यांना महाराजांनी लिहीलेले प्रत्र अत्यंत बोलके होते. ‘मोगलाई बरी वाटेल, असे वागू नका’ असे सांगतानाच ‘उंदीर दिव्यातील वात नेईल आणि त्यामुळे आग लागण्याचा संभव आहे,’ काफीखानासारखा इतिहास कारही महाराजांच्या उदारतेचे वर्णन करताना म्हणतो ‘शिवाजीचे सैन्य परप्रांतात घुसल्याच्यावेळेही मशिदी, कुराण आणि स्त्रिया सुरक्षित राहिल्या.’
‘सैन्याविना नैवराज्यं न धर्म पराक्रम’ हे लष्कराचे वैविध्य शुकनीतीमधे सांगीतले आहेत. ‘सैन्यावाचून राज्य धन अणि पराक्रम प्राप्त होत नाही’ महाराजांनी आपल्या लष्कराची आणि आरमाराची उभारणी हे सुत्र डोळ्यासमोर ठेवूनच केली. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ आणि ‘राजनिती’ या ग्रंथांतून नूतन सृष्टी उभी केली गेली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे सर्व सार यांत एकटवले आहे. आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला नि:पक्षपाती न्यायदान करणे, महसूल पध्दतीत सुसुत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन देणे, आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सैन्यदल उभारणे, किनारपट्टीवर पहारा करण्यासाठी आणि व्यापारासाठी आरमार उभारणे अशी विविध प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्षम आणि कारभाराची वैशिष्टये होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची सुव्यवस्थित घडी बसविण्यासाठी कर्तृत्व दाखविणाऱ्या अनेक व्यक्तींची निवड केली. स्वराज्यामागचे मुख्य सूत्र प्रजाहित असल्याने त्यांनी काटेकोर आणि कडक धोरण अवलंबले होते. त्यांनी सैन्यात शिस्त निर्माण केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखुनच आपल्या जवळ केली होती. महाराजांनी सतत सज्जन व्यक्ती, आपले सेनानी, स्त्रिया, संत महंत यांचा सन्मान केला त्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडचे अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता, दऱ्याखोऱ्या डोंगररांगाची भौगोलिक परिस्थिती, मर्यादित अशी लढाईची साधनसामुग्री, मर्यादित आर्थिक बळ ह्या गोष्टी विचारात घेऊन महाराजांनी आपली स्वतंत्र युद्धनीती आखलेली होती. शक्यतो शत्रुला समोरासमोर सामने न जात, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी अनेक गड किल्ले ताब्यात घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या परंतु महाराजांच्या कारकिर्दीतील अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा घेतलेला समाचार, पन्हाळगडाचा वेढा आणि आग्र्याहून सुटका हे कसोटीचे क्षण होते परंतु अशा प्रसंगावर धैर्याने मात करुन औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाला वठणीवर आणणारा शुरवीर म्हणून नाव लौकीक मिळविला.
औरंगजेबासारखा मातब्बर सम्राटाला नामोहरम करत मुघलासहीत सर्व शत्रूंचा समाचार घेतल्यानंतर महाराजांनी आदिलशहा व कुतुबशहा यांनाही आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पडले. आपले राज्य आता निर्धोक झाले आहे असे वाटल्यानंतर महाराजांनी राज्याभिषेक करुन घेण्याचे ठरविले. एका बखरीमध्ये लिहिले आहे की ‘महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जाणोन सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय झाला. किल्ले रायगडावर महाराजांचा राज्यभिषेक शास्त्रोक्त पद्धतीने मोठया दिमाखदारपणे संपन्न् झाला. राजमाता जिजाऊंच्या डोळयाचे पारणे फिटते मराठी जनतेला आपला राजा मिळाला एका लोककल्याणकारी राजाची कारकिर्द सुरु झाली म्हणून आसमंतात आनंदी आनंद झाला’.
'शिवरायांचे आठवावे रुप । शिवरायांचा आठवावा प्रताप ’॥, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन समर्थ रामदासांनी यथार्थ केले आहे.
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी एैसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हाकरिता॥
इतिहासाचार्य राजवाडे छत्रपती शिवरायांचे गुणगान करतांना म्हणतात ‘शिवाजीचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणाचे व परम सहिष्णुतेचे होते. अनेक लढायांत विजय संपादन करणे, मैदानात, समुद्र तीरावर किंवा डोंगरावर तीन चारशे किल्ले बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन कायदे करणे, स्वभाषेस उत्तेजन देणे, कवींना आश्रय देणे, नवी शहरे बसविणे, स्वधर्म स्थापन करुन त्याचे ऐश्वर्य वाढविणे, सारांश स्वराष्ट्राचा उद्धार करुन स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे, ह्या लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषाने ह्या भूमंडळाला अक्षय ऋणी करुन ठेवले असेल, तर ते शिवाजीनेच होय. शिवाजीची खाजगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते, की त्यांच्याशी तुलना करावयास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती ती ह्या नाही तर त्या गुणांने शिवाजीहून कमतरच दिसेल. ह्या अवतारी पुरुषाविषयी लिहिता लिहिता समर्थ म्हणतात, ‘ तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी ? यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यंवत, वरदवंत, सुशील, धर्ममूर्ति, निश्चयाचा महामेरु, अखंड निर्धारी राजयोगी ’ अशी नाना प्रकारची विशेषणे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी लाविली आहेत.
Previous article
Next article
Super
उत्तर द्याहटवाFantastic
उत्तर द्याहटवाTq
हटवाThanks
हटवाGood
उत्तर द्याहटवाTq
हटवा