निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत देणी त्वरित द्या- कामगार संघटना - दैनिक शिवस्वराज्य

निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत देणी त्वरित द्या- कामगार संघटना


एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महामंडळाच्या या कर्मचाऱ्यांना औषधपाण्यासाठी देखील पैसे नाहीत. त्यांची देणी तातडीने एकरकमी देण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
     यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधीकारी मंदार पोहोरे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तांच्या व्यथा मांडल्या. संदीप शिंदे यांनी सांगितले, २०१८ सालापासून सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची अंतिम देयके प्रलंबित आहेत. रजेचे वेतन व एकतर्फी वेतनवाढीचा फरक अद्यापीही त्यांना दिलेला नाही. जवळ पैसे नसल्याने सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या महामंडळाची तीस- पस्तीस वर्ष सेवा केली ज्या लालपरीसाठी घाम गाळला त्या लालपरीच्या सेवकांना औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. संघटनेने यापुर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. श्री. चन्ने यांनी रक्कम देण्याबाबत अनुकुल मत व्यक्त केले आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांच्या एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरीत रक्कम देण्यात यावी, प्रलंबित महागाई भत्ता, ८, १६, २४ टक्के घरभाडे भत्ता, ३ टक्के वेतनवाढीचा दर व सेवानिवृत्तांची देणी तातडीने देण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या ४ जुलै रोजी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारिणीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads