सप्टेंबरमध्ये देशात रोजगाराच्या संधीमध्ये वाढ
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या 'आयएचएस मार्किट इंडिया सव्र्हिसेस पीएमआय' निर्देशांक सप्टेंबरमध्ये ५५.२ नोंदला गेला आहे. ऑगस्ट महिन्यातील सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक १८ महिन्यांतील उच्चांकी म्हणजे ५६.७ असा नोंदला गेला होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.
रोजगाराच्या आघाडीवर सप्टेंबर महिन्यात आशादायी चित्र आहे. देशांतर्गत पातळीवर मागणी वाढण्याच्या आशेने सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त कर्मचारी भरती केली गेली. सलग नऊ महिन्यांच्या घसरणीला लगाम लागत १० महिन्यांत प्रथमच रोजगार वाढला आहे. करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह बहुतांश व्यवसायांवरील प्रतिबंध दूर झाल्याने त्याचे सुपरिणाम सेवा क्षेत्रावर कायम असल्याचे जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारी दाखवून देते.
टाळेबंदीमध्ये शिथिलतेनंतर मागणीमध्ये पुन्हा वाढ झाल्याने कंपन्यांना फायदा होत आहे. सप्टेंबर महिन्यात व्यवसायानुकूल वातावरण कायम असल्याने पुढेही देशांतर्गत व्यवसायांसाठी नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ सुरूच राहील, असे मत आयएचएस मार्किट इंडियाच्या अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी व्यक्त केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा