इंटरनेट सेवा बंद; एमपीएससी अर्जदारांना फटका संयुक्त पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढीची मागणी
त्रिपुरा येथील घटनेनंतर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तणाव निर्माण झाल्याने तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसत आहे. इंटरनेटअभावी ऑनलाईन अर्ज करता येत नसल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२१ च्या ६६६ पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा २६ फेब्रुवारीला होणार असून उमेदवारांना २९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत देण्यात आली आहे.
त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले. याशिवाय मालेगाव, नांदेड, भिवंडी येथेही मोठ्या संख्येने मोर्चे निघाले. त्यामुळे अशा अनेक शहरांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इंटरनेट बंद असल्याने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात अडचणी येत आहेत. मुदतीत अर्ज न केल्यास परीक्षेची संधी हुकणार आहे.
अमरावती येथील एका उमेदवाराने सांगितले की, करोनामुळे दोन वर्षे एमपीएससीची जाहिरात निघाली नाही. आता ६६६ पदांसाठी भरती होणार असल्याने आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत. सर्व विद्यार्थी नियमित अभ्यास करीत आहेत. मात्र, शहरात १९ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटच बंद असल्याने आम्ही अर्ज करू शकत नाही. काही उमेदवारांनी शहरांच्या दूर जाऊन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथेही इंटरनेट जोडणीची समस्या येत आहे. अशीच स्थिती राज्यातील अन्य काही जिल्ह्यांचीही आहे. त्यामुळे एमपीएससीने या सर्व परिस्थितीचा विचार करता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा