जळगाव 'गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
जळगाव, दि. ९ जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यवसायात अग्रेसर असल्याने 'गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवन संरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आर. एस. लोखंडे, अधिक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे मंडळ, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी, महाजनको प्रकल्प मुख्य अभियंता शशांक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचा समावेश होता.राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, जिल्ह्याच्या अविकसित भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः जलसिंचन प्रकल्पाच्या कामाची गती वाढवून तांत्रिक अडचणींवर उपाय शोधावा. राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरच्या रखडलेल्या कामाला विशेष प्रकरण म्हणून पूर्ण करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक अत्यंत महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, अहमदाबादसाठी विमानसेवा सुरु करण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.अटल भूजल योजनेंतर्गत अधिकाधिक पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मेघा रिचार्ज करणे आवश्यक असून पाण्याचा अपव्यय टाळून योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पाण्याचे तात्पुरते स्रोत निर्माण करण्याऐवजी अधिक टिकाऊ उपायांवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमृत प्रकल्प, कुसुम सोलार पंप योजना, जलजीवन मिशन, मनरेगा, आवास योजना, जिल्ह्यातील शाळा, आरोग्य योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सखी वन स्टॉप सेंटर, आहार योजना, पेसा, पीएम जनमन अभियान, अद्यावत वस्तू आणि सेवाकर यासह इतर योजनांचे सादरीकरण केले. प्रारंभी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा