जामनेर तालुक्यात ढालगाव येथे बिबट्याचा थरार! दांपत्यावर हल्ल्याचा प्रयत्न, सुदैवाने बचाव
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर: तालुक्यातील ढालगाव शिवारात काल संध्याकाळी एक थरारक घटना घडली. किरन अर्जुन पाटील आणि ज्योती किरण पाटील हे पती-पत्नी गट नंबर 52 मधील आपल्या शेताकडे जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलसमोर झडप घातली.ही घटना सायंकाळी सुमारे 4.45 वाजताच्या सुमारास घडली. बिबट्याला समोर पाहताच किरन पाटील यांनी घाबरून मोटारसायकलचा ताबडतोब ब्रेक दाबला. अचानक ब्रेक लागल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तातडीने जोरजोरात आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या शेतातील लोक धावत आले. जमलेल्या लोकांचा गोंधळ ऐकून बिबट्याने तिथून पळ काढला.या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सगळं इतक्या झटक्यात घडलं की काही कळायच्या आत आम्ही खाली पडलो. सुदैवाने वेळेत मदत मिळाली आणि मोठा अनर्थ टळला, असे किरण पाटील यांनी सांगितले.गावकऱ्यांनी वनविभागाला याबाबत तत्काळ माहिती दिली असून, या भागात बिबट्याच्या वावराची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभागाने योग्य ती काळजी घेण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा