करमाड – पळासखेडा शिवरस्ता शेतकऱ्यांसाठी खुला; महसूल, भूमी अभिलेख व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
जामनेर तालुक्यातील करमाड – पळासखेडा दरम्यान असलेला अंदाजे ३ किमीचा शिवरस्ता, ज्यातील सुमारे ०.५ किमी अंतर अतिक्रमित होते, तो आता महसूल, भूमी अभिलेख व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईने शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्तरीय अधिकारी यांनी अतिक्रमण झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत, संबंधित शेतकऱ्यांशी सामंजस्याचा प्रयत्न केला. मात्र दोन शेतकऱ्यांनी मोजणी झाल्याशिवाय रस्ता खुला न करण्याची भूमिका घेतली होती. अखेर दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख, जामनेर यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तात मोजणी करून रस्ता अधिकृतरित्या खुला करण्यात आला.
या कारवाईमुळे परिसरातील सुमारे ७० ते ९० शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी नितीन ब्याळे, रवींद्र घुले, ग्रामपंचायत अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशस्वी कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, तालुक्यातील इतर अडथळाग्रस्त शिव रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा