गोंडखेळ साखर कारखाना विक्री प्रकरण: शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक; "शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही" – जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा; आता काय होणार?
जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यासाठी दिलेल्या जमिनी विक्रीच्या प्रस्तावाविरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. दि .26 रोजी सकाळी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
जमिनी कोणालाही विकू नका, त्या आम्हालाच परत द्या अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडत, आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि दिलासा देत सांगितले, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे." यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त झाले असले तरी, "फक्त आश्वासनांनी नाही, तर निर्णयाच्या रूपाने न्याय मिळावा," अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
गोंडखेडचे माजी सरपंच पंढरी पुंडलिक वाघ, जे साखर कारखाना कमिटीचे सदस्य आहेत, यांनीही कमिटीच्या निर्णयावर ताशेरे ओढले. "मी कारखाना कमिटीच्या विक्री प्रस्तावाचा ठाम विरोध करतो आणि शेतकरी बांधवांच्या पाठीशील ताकदीने उभा आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाला बळ दिले.
आता मोठा प्रश्न उभा आहे – ३२ वर्षांपासून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना त्यांच्या बापजाद्यांच्या जमिनी परत मिळणार का? की पुन्हा एकदा कागदोपत्री खेळ खेळून त्यांना गळ्याला फास लावला जाणार?
शेतकरी रंजीत राजपूत, प्रभू राजपूत, अर्जुन चोपडे, भगवान चोपडे, जगतसिंग परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, शांताराम जाधव, रवींद्र चोपडे, विलास परदेशी, शांताराम पाटील, मधुकर पाटील, रणजीत पाटील, सिताराम मगर, ईश्वर मगर, भगत राजपूत, भगतसिंग परदेशी, सयाबाई तुकाराम, बन्सीलाल राजपूत, संग्रामसिंग राजपूत आदींनी एकमुखाने सांगितले, "जमिनी आमच्याच आहेत. जर विकायच्याच असतील, तर आम्हालाच परत द्या. आम्ही बाजारभावाने पैसे भरण्यास तयार आहोत.
आता ३१ मे रोजी होणाऱ्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही सभा शेतकऱ्यांच्या भवितव्याचा निर्णायक क्षण ठरेल का? की पुन्हा एखाद्या 'खाजगी व्यवहाराचा' अध्याय सुरू होईल? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतल्या आशा, तडफड, त्यांच्या जमिनीवरचा हक्क, आणि भविष्यातील संघर्ष यावरच पुढची दिशा ठरणार आहे.आम्हाला न्याय मिळावा, आमच्या जमिनी परत मिळाव्यात, हीच शेतकऱ्यांची साद आता शासनापर्यंत पोहोचली आहे... पण न्याय कधी मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा