महाराष्ट्र
आठवणींना उजाळा, सेवेला सलाम ; सोलापूर मनपातील आदर्श कर्मचारी आनंद थोरात यांचा भव्य निरोप सोहळा..
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : सोलापूर महानगरपालिकेत तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावणारे आनंद लक्ष्मण थोरात यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित स्नेहसंमेलन व सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी तसेच अंत्रोळी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
दीर्घ सेवाकाळात आनंद थोरात यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसेवेची बांधिलकी जपत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश (अण्णा) आसबे तसेच लक्ष्मण (काका) जाधव उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून थोरात यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात कुटुंबीयांनीही आपल्या भावना व्यक्त करत आनंद थोरात यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाला उजाळा दिला. सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या समारंभाच्या निमित्ताने उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि यशस्वी जावो, अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा