वरणगावजवळ भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू - दैनिक शिवस्वराज्य

वरणगावजवळ भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी राजकुमार सपकाळे
भुसावळ, दि. ५ जून २०२६ – जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील महिला, चिमुकली मुलगी आणि दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा भीषण अपघात घडला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील आदिवासी समाजातील विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १) हे चौघे दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वरणगाव बायपासजवळ राष्ट्रीय महामार्गावर त्यांची दुचाकी पोहोचली असता एमएच-१९ ईव्ही-५३५३ क्रमांकाच्या भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीवरील सर्वजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.
एकाच कुटुंबातील चार जीवांचा अंत
या अपघातात एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने मलकापूर परिसरासह वरणगाव व जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः एका वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी गर्दी केली. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी हंबरडा फोडला. रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकही भावूक झाले.
स्कॉर्पिओ चालकही गंभीर जखमी
दरम्यान, अपघातात स्कॉर्पिओ वाहनाचा चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि चालकाची जबाबदारी याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
कठोर कारवाईची मागणी
या भीषण अपघातानंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads