राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व बहुजन मुक्ती पार्टीचे पहूर महावितरण उपविभागावर ताला ठोको आंदोलन
पहूर, दि. 19 जून 2026 : पहूर महावितरण उपविभागामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सोलर ऊर्जा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांऐवजी अपात्र तसेच बोगस लाभार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, नवी दिल्ली व बहुजन मुक्ती पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी पहूर महावितरण उपविभाग कार्यालयावर ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या उपराज्याध्यक्षा अश्विनीताई भाकडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी आंदोलकांनी महावितरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ खरे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल सपकाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य महासचिव (प्रशिक्षण) ॲड. रणजीत तडवी, कार्यकारी सदस्य रोनक तडवी, जिल्हाध्यक्ष गफूर तडवी, तालुकाध्यक्ष हाजरा तडवी, सामाजिक कार्यकर्ते समीर तडवी, सामाजिक कार्यकर्ते रवी मोरे, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे सिरज तडवी, पाचोरा तालुकाध्यक्ष जलाल तडवी, सिल्लोड तालुकाध्यक्ष फारुख तडवी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रज्जाक तडवी, नंदलाल आगारे, उखा तडवी, दगडू तडवी, अफजल तडवी, मुस्तफा तडवी यांच्यासह अनुसूचित जाती-जमाती समाजाचे असंख्य कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सोलर ऊर्जा योजनेतील लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि वंचित पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान महावितरण प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सोलर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची फेरतपासणी करून गैरप्रकार उघडकीस आणावेत तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
सदर आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून या आंदोलनामुळे पहूर परिसरात सोलर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व बहुजन मुक्ती पार्टी यांचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा