आंतरजिल्हा मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात ; १४ गुन्ह्यांची उकल,६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.... सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ; सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कर्नाटकातील चोरीच्या मोटारसायकली हस्तगत - दैनिक शिवस्वराज्य

आंतरजिल्हा मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात ; १४ गुन्ह्यांची उकल,६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.... सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ; सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कर्नाटकातील चोरीच्या मोटारसायकली हस्तगत


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : सोलापूर शहरात सातत्याने वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर गुन्हे शाखेने मोठा आघात करत आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक केली आहे. आरोपीकडून सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील एकूण १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
        फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ५ जून २०२६ रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढला. दरम्यान, १२ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात चोरीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या संशयिताला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) असे सांगितले. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने वसंत विहार परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरटीओ नोंदीतील चेसीस व इंजिन क्रमांक पडताळल्यानंतर ती मोटारसायकल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
    यानंतर अधिक तपासात आरोपीने सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कर्नाटक राज्यातून आणखी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार आणखी १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
    या कारवाईमुळे सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटक राज्यातील १ अशा एकूण १४ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
     ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads