मंद्रूपच्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ३९३ विविध दाखल्यांचे वितरण ; २७७ एनसीएमसी बस सवलत कार्डांचे वाटप - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूपच्या महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ३९३ विविध दाखल्यांचे वितरण ; २७७ एनसीएमसी बस सवलत कार्डांचे वाटप


समीर शेख प्रतिनिधी
मंद्रूप : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' मंद्रूप येथे उत्साहात पार पडले. शिबिरात विविध विभागांकडून सेवा देत ३९३ विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, तर २७७ नागरिकांना एनसीएमसी बस सवलत कार्डे देण्यात आली.
    दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. तहसीलदार विष्णू बुटे यांनी प्रास्ताविकातून अभियानाची माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
    शिबिरात आरोग्य विभागाने ५२ नागरिकांची आरोग्य तपासणी केली, तर ७७ जणांची आयुष्मान भारत कार्डे तयार करण्यात आली. एकात्मिक बालविकास विभागामार्फत १० लाभार्थींना बेबी किटचे वाटप करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने २७७ नागरिकांना एनसीएमसी कार्डे दिली. तसेच ३१ नागरिकांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली.
   संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनांतील ७० लाभार्थींना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले. महावितरणने प्रधानमंत्री सूर्य घर योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची माहिती देत २५ कृषी पंप मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण केले.
    यावेळी डिजिटल ७/१२, फेरफार उतारे, कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती आदेश, जन्म-मृत्यू नोंदणी आदेश तसेच रस्ता प्रकरणांवरील आदेश देण्यात आले. याशिवाय ९७ जात प्रमाणपत्रे, १८५ उत्पन्न दाखले, १० ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे, १०० अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रे आणि १ नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र लाभार्थींना वितरित करण्यात आले.
एसआयआरचे शंभर टक्के काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुरवठा विभागाने रेशनकार्डसंदर्भातील ४४ अर्जांवर कार्यवाही केली, तर कृषी विभागामार्फत विविध योजनांतील लाभार्थींना शेतीउपयोगी अवजारांचे वाटप करण्यात आले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पवार व अमोल मगर यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक तसेच महा-ई-सेवा केंद्रचालकांनी विशेष परिश्रम घेतले.
"शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळावा, हा या महाराजस्व समाधान शिबिरामागील मुख्य उद्देश आहे," असे तहसीलदार विष्णू बुटे यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads