जामनेरचा कोहिनूर हिरा! अभिनेता ईश्वर चौधरी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६’ने गौरव - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरचा कोहिनूर हिरा! अभिनेता ईश्वर चौधरी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६’ने गौरव

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेरच्या मातीतून अभिनय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत पुढे आलेले अभिनेते ईश्वर चौधरी म्हणजे जामनेरचा कोहिनूर हिरा! तब्बल तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सातत्याने मेहनत, संघर्ष आणि धडपड करणाऱ्या ईश्वर चौधरी यांच्या या मेहनतीला अखेर मानाची पावती मिळाली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची दखल घेत त्यांना ‘बेस्ट अॅक्टर – दादासाहेब फाळके अवॉर्ड २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृह, डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आयोजित दिमाखदार कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना (महाराष्ट्र)’ यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
तीन वर्षांचा संघर्ष... मुंबई-पुण्याच्या कित्येक फेऱ्या!
अभिनय क्षेत्रात नाव कमावणे सोपे नसते. गेल्या तीन वर्षांपासून ईश्वर चौधरी यांनी या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अथक मेहनत घेतली. कामाच्या शोधात आणि अभिनयाच्या संधींसाठी त्यांनी अनेक वेळा मुंबई आणि पुण्याच्या फेऱ्या मारल्या. अनेकदा प्रयत्न करूनही अपेक्षित संधी मिळत नव्हती; मात्र त्यांनी हार मानली नाही.
‘आज नाही तर उद्या आपली वेळ येईल’ या विश्वासाने त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या मेहनतीला यशाची पहिली मोठी झळाळी मिळाली आणि दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव झाला. त्यामुळे हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, त्यांच्या तीन वर्षांच्या संघर्षाला मिळालेली मानाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील गुंडाच्या भूमिकेने वेधले लक्ष
ईश्वर चौधरी यांनी झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गुंडाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.
त्यानंतर खान्देशी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘गुल्हेर’ आणि ‘गुल्हेर-२’ या चित्रपटांमध्ये त्यांनी लीड हिरो म्हणून भूमिका साकारली आहे. तसेच ‘जब्या’, ‘अपहरण’ यांसह विविध शॉर्ट फिल्म्समध्येही त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
जामनेरच्या कोहिनूरची चमक आता मनोरंजन क्षेत्रात!
जामनेरच्या मातीतून पुढे आलेल्या ईश्वर चौधरी यांच्या यशामुळे जामनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तीन वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या सन्मानामुळे ‘जामनेरचा कोहिनूर हिरा’ आता अभिनय क्षेत्रात अधिक जोमाने चमकण्यास सज्ज झाला आहे.
अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची त्यांची धडपडही उल्लेखनीय आहे. कला आणि समाजकार्याचा हा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी वेगळी ओळख देतो.संघर्षातून यशाचा प्रवास; ईश्वर चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावतीन वर्षे मेहनत, मुंबई-पुण्याच्या असंख्य फेऱ्या, अनेक प्रयत्न आणि नंतर मिळालेली संधी... या संघर्षमय प्रवासातून ईश्वर चौधरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल चित्रपटसृष्टी, मित्रपरिवार, चाहते आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामनेरचा हा कोहिनूर हिरा भविष्यातही आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी भरारी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, ईश्वर चौधरी यांच्या पुढील कलाप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads