शिक्षक पेशाला काळिमा फासणारी घटनाजामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप; संतप्त जमावाचा उद्रेक, कार पेटवली - दैनिक शिवस्वराज्य

शिक्षक पेशाला काळिमा फासणारी घटनाजामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप; संतप्त जमावाचा उद्रेक, कार पेटवली

प्रतिनिधी बोदवड
बोदवड तालुक्यातील जामठी येथे शिक्षक पेशाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी संतापजनक घटना समोर आली आहे. खासगी क्लासच्या शिक्षकावर अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली.

घटनेची माहिती समोर येताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी संबंधित शिक्षकाच्या घराकडे जमाव गेल्याचे सांगण्यात येत असून, त्याची कार पेटवण्यात आल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. मात्र, संतप्त जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली.

पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर

परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला तसेच सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जामठी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 पॉक्सो कायद्यानुसार कारवाईकडे लक्ष

अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. संबंधित शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे जामठी परिसरासह संपूर्ण बोदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads