टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वाराची मागणी; वैचारिक व्याख्यान उत्साहातमहात्मा फुले हेच खरे शिवजयंतीचे जनक — शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
जामनेर टाकळी खुर्द : तालुक्यातील टाकळी खुर्द येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिरासमोर शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, तर सायंकाळी वैचारिक व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे बाळू चवरे यांनी केले. अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रा. आकाश बिवाल, गणेश महाजन, अतिक नबी पिंजारी, धनराज चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गावाच्या वतीने मान्यवरांचे ‘सार्वजनिक सत्यधर्म’ तसेच गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
सत्यशोधक प्रवेशद्वारासाठी ठराव
सत्यशोधक रमेशदादा वराडे यांच्या संकल्पनेतून टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीचा फलक मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आला. यावेळी प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. लवकरच गावात दिमाखदार सत्यशोधक प्रवेशद्वार उभे राहील, अशी अपेक्षा पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
‘महापुरुषांना डोक्यावर नाही, डोक्यात घ्या’
प्रमुख व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी वामनदादा कर्डक यांचे ‘स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले’ हे गीत सादर करून व्याख्यानाला सुरुवात केली. २४ सप्टेंबरच्या शाक्त राज्याभिषेक दिनासह सत्यशोधक समाज स्थापनेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.
“शिवराय–फुले–शाहू–आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत. महापुरुषांना डोक्यावर नाही, तर डोक्यात घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हीच आपली मूल्ये आहेत,” असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहण्याचे आवाहन
अध्यक्षीय भाषणात पी. डी. पाटील यांनी टाकळी खुर्दमधील नागरिकांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला दूर सारून सत्यशोधक विचारांची कास धरावी, असे आवाहन केले. सत्यशोधक पद्धतीने विवाह, गृहप्रवेश, दशपिंड व गंधमुक्तीचे कार्यक्रम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“सर्व साक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती” हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य असून, भयमुक्त व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक विचारांचा प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय दुधे यांनी महापुरुषांचा जयघोष करत वातावरणात उत्साह निर्माण केला. बाळू चवरे व रमेशदादा वराडे यांनीही गावकऱ्यांना सत्यशोधक समाजाच्या विचारांच्या वाटेवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला माजी सरपंच समाधान वराडे, मंगलदास अहिरे, सारंगधर अहिरे, बाळू चवरे माळी, पवन माळी, फोटोग्राफर प्रवीण गावंडे यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, माळी महासंघ, एकता तरुण मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, रॉयल किंग ग्रुप, राजमाता व सावित्रीबाई फुले महिला बचत गट, सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी, महिला, पुरुष व तरुण कार्यकर्ते तसेच टाकळी खुर्द येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक कैलास महाजन यांनी केले, तर आभार रमेशदादा वराडे यांनी मानले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा