भुसावळ महामार्गावरील धोकादायक क्रॉसिंग बंद कराडिव्हायडरमध्ये लोखंडी जाळी बसवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची पोलीस हक्क संघर्ष संघटनेची मागणी
भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेता महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसवावी, तसेच महामार्गाच्या बाजूने असलेले अनधिकृत रस्ते क्रॉसिंग व मार्ग तातडीने बंद करावेत, अशी मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा जळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई तल्लारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग/सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांना निवेदन देण्यात आले.
भुसावळ शहरातील वांजोळा रोड चौक, सिटी हॉस्पिटल, आर. के. पेट्रोल पंप, राधाकृष्ण हॉटेल आदी परिसरात नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून शॉर्टकटने रस्ता ओलांडण्याचे प्रकार होत आहेत. तसेच महामार्गाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेतून नागरिक रस्ता पार करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
हॉटेल गॅलेक्सी व मशिदीकडे जाण्यासाठी १०० मीटर रस्ता तयार करण्याची मागणी
महामार्गावरील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हॉटेल गॅलेक्सी तसेच मशिदीकडे जाण्यासाठी सुमारे १०० मीटरचा सुरक्षित रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांना अनधिकृत मार्गाने महामार्ग ओलांडण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक ठिकाणी सुरक्षित पादचारी मार्ग व अधिकृत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने संबंधित विभागाने या परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक क्रॉसिंग बंद करावीत, डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने या मागणीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
निवेदनावेळी उपस्थित पदाधिकारी :
प्रदेश संघटक फैयाज हुसेन, खानदेश अध्यक्ष शेख फिरोज रहमान, उपजिल्हाप्रमुख नदीम शेख, उपजिल्हाप्रमुख ओसामा खान, सोशल मीडिया सेल अध्यक्ष बाबू खान, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष फिरोज तडवी, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष अबुजर शेख, सदस्य आशा कोठारी, उत्तर महाराष्ट्र मीडिया सेल उपाध्यक्ष सद्दाम खाटीक, सलीम भाई, शहर प्रमुख अकबर गवळी, युवा जिल्हा प्रमुख फरहान शेख तसेच सोशल मीडिया पदाधिकारी असगर शेख आदी उपस्थित होते.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा