माणुसकीचा झरा अजूनही जिवंत!फत्तेपूरच्या संजय चौधरी यांनी भरकटलेल्या ७८ वर्षीय वृद्धाला पोहोचवले कुटुंबीयांच्या स्वाधीन - दैनिक शिवस्वराज्य

माणुसकीचा झरा अजूनही जिवंत!फत्तेपूरच्या संजय चौधरी यांनी भरकटलेल्या ७८ वर्षीय वृद्धाला पोहोचवले कुटुंबीयांच्या स्वाधीन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

आजच्या धावपळीच्या जीवनात माणुसकी हरवत चालल्याची चर्चा नेहमीच होते; मात्र संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणारी माणसे आजही समाजात आहेत, याचा प्रत्यय फत्तेपूर येथे आला. कोल्हापूर जिल्ह्यातील एका ७८ वर्षीय वृद्धाला सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दोन दिवस जळगाव परिसरात भरकटले

कोल्हापूर जिल्ह्यातील पोळगाव कासार येथील रहिवासी शिवाजी शंकर दोरूगडे (वय ७८) हे आपल्या मित्रपरिवारासोबत दिल्ली येथे सत्संगासाठी जात होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ते चुकून जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले. मोबाईल फोन जवळ नसल्यामुळे त्यांना आपल्या सहकाऱ्यांशी व कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही. परिणामी, ते दोन दिवस भरकटलेल्या अवस्थेत फिरत होते.

त्यानंतर ते जळगाव बसस्थानकावरून सायंकाळी जळगाव–कोऱ्हाळा मुक्कामी बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान बसवाहकाने त्यांची विचारपूस केली. वृद्धांकडील आधारकार्ड पाहिल्यानंतर त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याचे वाहकाच्या लक्षात आले. रात्रीच्या वेळी या वृद्धाला रस्त्यात उतरविणे योग्य ठरणार नाही, याची जाणीव झाल्याने वाहकाने मदतीचा मार्ग शोधला.

संजय चौधरी यांनी घेतली आस्थेवाईक काळजी

बसवाहकाच्या परिचयाचे असलेले फत्तेपूर येथील माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी यांची त्याला आठवण झाली. त्यानुसार फत्तेपूर बसस्थानकावर या वृद्धाला संजय चौधरी यांच्या स्वाधीन करण्यात आले.

रात्रीची वेळ असल्याने संजय चौधरी यांनी वृद्धाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि सर्वप्रथम त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर आधारकार्डावरील माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाच्या परिचयातील कोल्हापूर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वृद्धाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून रात्रीच मोबाईलवर त्यांचे बोलणे करून दिले.

कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला!

दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्धाचे कुटुंबीय फत्तेपूर येथे पोहोचले. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती सुरक्षित असल्याचे पाहून त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी संजय चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले आणि शिवाजी दोरूगडे यांना सुखरूप घरी घेऊन गेले.

एका अनोळखी वृद्धाला आपलेपणाने मदत करून त्यांच्या कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणणाऱ्या संजय चौधरी यांच्या कृतीतून माणुसकीचे खरे दर्शन घडले. संकटाच्या वेळी मदतीचा हात देणारी माणसेच समाजातील विश्वास आणि आपुलकी टिकवून ठेवतात, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

1 Comments

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads