जामनेरात बंद अवस्थेतील CCTV कॅमेऱ्यांना पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन!शहरातील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर; कोट्यवधींचा खर्च करून बसवलेले CCTV कॅमेरे धूळखातअतिक्रमण दिसते, मग बंद अवस्थेतील CCTV कॅमेरे नगरपालिकेला का दिसत नाहीत? – अविनाश बोरसे - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात बंद अवस्थेतील CCTV कॅमेऱ्यांना पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन!शहरातील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर; कोट्यवधींचा खर्च करून बसवलेले CCTV कॅमेरे धूळखातअतिक्रमण दिसते, मग बंद अवस्थेतील CCTV कॅमेरे नगरपालिकेला का दिसत नाहीत? – अविनाश बोरसे

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेले CCTV कॅमेरे आज बंद अवस्थेत आणि दुरवस्थेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी केला आहे. या निषेधार्थ बंद पडलेल्या CCTV कॅमेऱ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधले.

जामनेर शहरात गेल्या पाच ते आठ वर्षांपासून अनेक CCTV कॅमेरे बंद असल्याचा दावा करण्यात येत आहे. शहरात चोरी, घरफोडी, मंदिर आणि दुकानांमधील चोरी, महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावणे, दुचाकी, मोबाईल व पाकीट चोरी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे बोरसे यांनी म्हटले आहे.

शहरात अपघातांच्या घटनाही वाढत असून, चारचाकी वाहने तसेच डंपरच्या अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा वेळी CCTV यंत्रणा कार्यान्वित असती, तर गुन्हेगारांचा शोध घेण्यास आणि अपघातांतील वाहनांची ओळख पटविण्यास मदत झाली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अतिक्रमणावर कारवाई, मग CCTV कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष का?

नगरपरिषदेला रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, हातगाड्या आणि छोट्या टपऱ्यांचे अतिक्रमण दिसते; मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची असलेली बंद अवस्थेतील CCTV यंत्रणा का दिसत नाही? असा सवाल अविनाश बोरसे यांनी उपस्थित केला आहे.

शहरात विना नंबर प्लेट तसेच चोरीच्या वाळूची वाहतूक करणारे डंपर फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वाहनचालकांना राजकीय व प्रशासकीय स्तरावरून संरक्षण मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला असून, या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा

जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस निरीक्षकांनी नगरपरिषद प्रशासनाला CCTV कॅमेरे तातडीने सुरू करण्याबाबत अधिकृत पत्र द्यावे. तसेच शहरातील सर्व कॅमेऱ्यांची तपासणी करून बंद असलेली यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी बोरसे यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी दिला आहे.

आता नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads