जामनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार, एक गंभीर जखमी
जामनेर तालुक्यातील ओझर गावात राहणाऱ्या दोन तरुणांचा दुर्दैवी अपघात झाला असून, एका अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यापैकी एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, ओझर गावातील रामू विठ्ठल सोनवणे (वय 19) आणि विष्णू रघुनाथ मोरे (वय 17) हे दोघे काही कामानिमित्त बोदवड येथे जात होते. मोटारसायकलवरून प्रवास करत असताना माल दाभाडी गावाजवळ अचानक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विष्णू रघुनाथ मोरे जागेवरच ठार झाला, तर मोटारसायकल चालवत असलेला रामू विठ्ठल सोनवणे गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी रामूला तातडीने उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले. सध्या रामूवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ओझर गावात शोककळा पसरली आहे. विष्णूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा