गोकुळचे मतदान 25 एप्रिल किंवा 2 मे रोजी - दैनिक शिवस्वराज्य

गोकुळचे मतदान 25 एप्रिल किंवा 2 मे रोजी


कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी 25 एप्रिल किंवा 2 मे 2021 रोजी मतदान होणार आहे. 12 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांत निवडणूक अधिकार्‍यांची नेमणूक प्राधिकरणाकडून होईल. त्यानंतर या दोनपैकी एक मतदानाची तारीख निश्चित केली जाईल. मतदानाच्या दुसर्‍याच दिवशी मतमोजणी होईल.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत 23 एप्रिल 2020 रोजी संपल्यानंतर कोरोना महामारीमुळे मुदतवाढ मिळाली. 'गोकुळ'साठी 3,659 क्रियाशील मतदारांची संख्या आहे. यातील चार संस्थांनी ठरावच दाखल केले नाहीत. एका संस्थेने दाखल केलेला ठराव न्यायप्रविष्ट आहे.

त्यामुळे यंदाच्या वर्षी मतदान करणार्‍या संस्थांची संख्या 3,654 किंवा 3,655 इतकी असेल. 'गोकुळ'साठी यावेळी एकूण 21 संचालक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये 16 सर्वसाधारण गट, एक अनुसूचित जाती-जमाती, एक भटका विमुक्त, एक जागा इतर मागासवर्गीय आणि दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत.

'गोकुळ'ची अंतिम मतदारयादी 12 मार्च रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर 45 दिवसांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा मे महिन्याच्या पहिल्या रविवारी मतदान होणार आहे. ही तारीख 'गोकुळ'साठी नेमणूक केलेला निवडणूक अधिकारी निश्चित करेल.

घडामोडी वेगावणार

'गोकुळ'च्या हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. सोमवारी 8 मार्च रोजी निकाल होऊन 10 मार्चपर्यंत अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. अंतिम यादी 12 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर खर्‍या अर्थाने प्रशासकीय आणि राजकीय घडामोडी वेगावणार आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यात बिनविरोधासाठी सुरू असलेल्या बैठकीची दुसरी फेरी त्यानंतरच होणार आहे. 15 मार्चदरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍याची नेमणूक केली जाईल. प्राधिकरणामार्फत ही निवड होणार असली, तरी सोयीचा माणूस असावा, यासाठी 'फिल्डिंग' लागली आहे.

निवडणुकीचा नियोजित कार्यक्रम...

• हरकती व सुनावणीनंतर 12 मार्चपर्यंत अंतिम मतदारयादी जाहीर.
• 22 मार्चदरम्यान निवडणूक अर्ज दाखल.
• सुट्ट्यावगळून 35 दिवसांत साधारणत:
25 एप्रिल किंवा 2 मेच्या रविवारी मतदान आणि दुसर्‍या दिवशी मतमोजणी.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads