मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडला - दैनिक शिवस्वराज्य

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडला


प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण (50) यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडी या ठिकाणी आज आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी१०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ असल्याचं तपासात आढळून आलं.

लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads