पंतप्रधानांना पश्चिम बंगालला जायला वेळ आहे पण दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधानांना पश्चिम बंगालमध्ये जायला वेळ आहे पण दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडची राजधानी रांची येथील हरमू मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, "केंद्राची सत्ता भाजपच्या हातात गेल्यानंतर देशात धार्मिक तेढ वाढलं आहे." त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाकेड दुर्लक्ष करणाऱ्या मोदींवर टीका करताना पवार म्हणाले, "पंतप्रधानांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. आज पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ आहे मात्र, देशाच्या राजधानीजवळ २० किमी अंतरावर गेल्या १०० दिवसांपासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही."
यावेळी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल काँग्रेस पक्ष आणि ममता बॅनर्जी यांची बाजू घेताना पवार म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला जनतेनं मुख्यमंत्री बनवलं त्यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या लोकांच्या हातात सत्ता येऊ द्यायची नाही हे आपल्याला निश्चित करावं लागेल." कोरोनाच्या काळात लोकांना आलेल्या अडचणींच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, "मोदींनी काय केलं? भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं थाळ्या वाजवा आणि लोकांना जागृत करा. मात्र, आम्ही थाळ्या वाजवणारे नाही, तर या थाळीत जेवण कसं येईल याची चिंता करणारे आहोत."
दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांनी गेल्या आठवड्यात ट्वीटद्वारे म्हटलं होतं की, पंतप्रधान केरळपासून आसामपर्यंत फिरत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दिल्लीच्या सीमांवर २० किमी जाऊन शेतकऱ्यांची भेट घ्यावीशी वाटत नाही. त्यांच्याकडे इतका वेळ आणि इच्छाही नाही.
आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
साहेब, निवृत्ती घ्या आता. लय झालं
उत्तर द्याहटवा