किल्ले रायगडावर सापडले पुरातन सोने
किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या महत्वपूर्ण वास्तूंच्या उत्खननादरम्यान पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या आहेत. जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस सुरू असलेल्या एका मोठ्या वाड्यांमधून एक सोन्याची बांगडी आणि अन्य वस्तू सापडल्या आहेत. याबाबतची माहिती प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.२) तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी प्राधिकरणाच्या बांधकाम विभाग स्पेशल सेलचे कार्यकारी अभियंता श्री सातपुते आणि प्राधिकरणाचे कन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्ट वरुण भामरे उपस्थित होते.
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती देताना खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड आणि आसपासच्या परिसरातील उत्खनन तसेच ऐतिहासिक दर्जा सांभाळून विकासकामे सुरू आहेत.
या संदर्भात गडावरील विविध वास्तूंच्या उत्खननाची कामे रायगड प्राधिकरणाने केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत सुरू केली आहेत. यामध्ये आजपर्यंत गेल्या तीन वर्षांत अनेक सोन्या चांदीचे दागिने, वस्तू भांडयांचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
सध्या सुरू असलेल्या गडावरील जगदीश्वर मंदिराजवळ डाव्या बाजूस असणाऱ्या वाड्यांचे उत्खनन सुरु होते. यावेळी शुक्रवारी दुपारी एका वाड्यातून एक सोन्याची बांगडी तसेच काही अन्य दागिन्यांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. या बांगड्या वरील असलेले नक्षीकाम लक्षात घेता त्या काळातील विविधता व सुबकतेने केलेली कामे दिसून येतात. असे मत संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेवेळी व्यक्त केले. रायगड प्राधिकरणानुसार किल्ले रायगडाच्या पुनर्शोध घेता असतानाच ही कामे अत्यंत महत्त्वाची असून उत्खननाची कामे हे रायगड प्राधिकरणाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच संभाजी राजेंनी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांची जबाबदारी ही आपली असून किल्ल्यावरील सर्व कामांवर आपण एक रक्षक म्हणून २४ तास लक्ष ठेवून असतो असे नमूद केले.
किल्ले रायगडावर सुमारे तीनशे ते साडेतीनशे जुन्या वास्तू असून केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या कामाचा वेग पाहता ही कामे अशाच पध्दतीने सुरू राहिल्यास किमान पंचवीस वर्षे लागतील. त्यामुळे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण रायगड प्राधिकरणाचे आणि पुरातत्व खात्याचे काम एकत्रितपणे करण्याची विनंती केली आहे. यावेळी संभाजी राजेंनी एकत्रित काम केल्याने कामे सात ते आठ वर्षांच्या आत पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला.
मागील तीन वर्षांपासून रायगडावरील विविध वास्तूंमध्ये सापडलेले विविध सोने, दागिन्यांचे वस्तू तसेच अन्य विविध प्रकारच्या वस्तूंचे जतन संग्रहालय औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. आगामी काळात प्राधिकरणाच्या पाचाड येथे शिवसृष्टी प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या म्युझियममध्ये या सर्व गोष्टी ठेवण्यात येतील अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा