.....तर मी पोलीस कॉन्स्टेबलचीही माफी मागेन : फडणवीस - दैनिक शिवस्वराज्य

.....तर मी पोलीस कॉन्स्टेबलचीही माफी मागेन : फडणवीस


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केलेल्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावरुन ज्युलिओ रिबेरो यांनी फडणवीसांवर टीका करताना सत्तेसाठी सैरभेर झाल्याचं म्हटलं होतं. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या लेखात त्यांनी ही टीका केली होती. फडणवीसांनीदेखील इंडियन एक्स्प्रेच्या माध्यमातून पत्र लिहित आपली बाजून मांडली आहे. जर मी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागतानाही मी मागे पुढे पाहणार नाही असं यावेळी ते म्हणाले आहेत.

"माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळाबद्दल आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. यावेळी मला तुमच्याप्रती असणारा आदरही व्यक्त करायचा आहे. आपलं काही मुद्द्यांवर मतांतर असू शकतं, पण तुमच्या स्पष्टवक्तेपणा आणि वचबद्धतेने नेहमीच मला प्रभावित केलं आहे. मी तुमच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांचा प्रतिकार करण्यासाठी हे पत्र लिहित नाही. मी कोणतीही रचनात्मक टीका योग्य पद्दतीन घेते. महाविकास आघाडीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला आहे त्याबाबत मी तथ्य समोर आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हे पत्र लिहित आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.


"सर्वात प्रथम मी आणि प्रवीण दरेकर एकही रेमडेसिविर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. आम्ही एफडीएला लिहिलेल्या पत्रातही फक्त समनव्य घडवून आणत असून एफडीएने खरेदी करावी असा उल्लेख केला आहे. यामध्ये प्रशासकीय पातळीवर काही अडचण असल्यास आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो असाही प्रस्ताव दिला. प्रवीण दरेकर यांनी उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांचा संवाद घडवून आणला. यासंबंधी एफडीएकडून त्या उत्पादक कंपनीला अधिकृत पत्र देत फक्त महाराष्ट्राला हा पुरवठा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राशिवाय इतर कोणाला पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. एफडीए मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतही हा साठा राज्य सरकारसाठी होता हे स्पष्ट केलं आहे," असं ते म्हणाले आहेत.


"मी डीसीपी ऑफिसला का गेलो? कंपनीच्या एका संचालकाला मंत्र्याच्या ओएसडीने फोन करुन विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिविर का देत आहात अशी विचारणा केली. तुम्ही फक्त सरकारच्या सांगण्यावरुन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण सरकारलाच रेमडेसिविर देत असून यासंबंधी एफडीए मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. त्याच संध्याकाळी एक एपीआय ट्रॅप करण्यासाठी साध्या कपड्यांमध्ये पोहोचले आणि रेमडेसिविरची मागणी केली. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर आठ ते १० पोलीस आणि एक अधिकारी त्यांच्या घऱी गेले. त्यांनी त्यांचा फोन तपासला आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. प्रवीण दरेकर यांनी माझी भेट घेतली आणि काहीतरी गौडबंगाल असल्याचं सांगितलं," अशी माहिती फडणवीसांनी दिली.


पुढे ते म्हणालेत की, "मी सहपोलीस आयुक्तांनी दोन ते तीन वेळा सगळा घटनाक्रम सांगितला. यावेळी मी पोलीस आयुक्तांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळालं नाही. पण मी काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ही नियोजित कारवाई असून सरकारमधील काही मंत्र्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा अंदाज मला आला. कायदेशीररित्या महाराष्ट्राला अत्यंत गरज असणाऱ्या औषधाचा पुरवठा करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्तीचा असा छळ होऊ न देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती".


"मी जाहीर न करताच पोहोचलो नव्हतो. मी डीसीपींना मेसेज करुन यासंबंधी सांगितलं होतं. तसंच कोणतंही उत्तर न मिळाल्याने डीसीपी ऑफिसला येत असल्याचं सांगितलं होतं. मी सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही कळवलं होतं. ऑर्डरसंबंधी कोणतीही माहिती नाही सांगणाऱ्या पोलीस आयुक्तांकडे आम्ही एफडीए ऑर्डरची प्रत सोपवली. यावेळी आम्ही त्यांनी त्यांच्याकडे कंपनीने साठा केला आहे का? विचारणा करत केला असेल तर कारवाई करा असंही सांगितलं," अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.


"अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर कंपनीच्या संचालकाला सोडून दिलं आणि गरज लागली तर चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाईल असं सांगितलं. माजी मुख्यमंत्र्याने पोलीस स्टेशन किंवा डीसीपी कार्यालयात जावं का यावर वाद-विवाद होऊ शकतो. पण फक्त आमच्या सांगण्यावरुन राज्याच्या मदतीसाठी तयारी दर्शवली म्हणून एखाद्या व्यक्तीचा होणारा छळ रोखण्यासाठी जाणुबुजून मी हा निर्णय घेतला होता," असं फडणवीस म्हणाले आहेत.


"गृहमंत्री म्हणून मी कधीही तडजोड केली नाही. जर मी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागतानाही मी मागे पुढे पाहणार नाही. मी तुमच्या मतांचा आदर करतो आणि भविष्यात अशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करेन," अशी हमी फडणवीसांनी दिली आहे.


"विरोधक म्हणून आम्ही फक्त बोट दाखवत बसण्यापेक्षा राज्य संकटात असताना अशावेळी आपले स्त्रोत आणि संपर्क वापरत मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. हाच विचार करुन प्रवीण दरेकर दमणला गेले होते. कंपनीला परवानगी मिळावी यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि अधिकाधिक रेमडेसिविर महाराष्ट्राला मिळाव्यात अशी अट घातली. संकटाच्या काळात आम्ही मनापासून केलेल्या प्रयत्नांचं असं राजकारण होईल वाटलं नव्हतं. महाविकास आघाडी आणि आपसारख्या पक्षाच्या समर्थकांनी खोटी आणि बनावट व्हिडीओ व बातम्या तयार करुन व्हायरल केल्या. मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे," असं फडणवीसांनी सांगितलं आहे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads