कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना शुक्रवारी प्रशासक म्हणून मुदतवाढ देण्यात आली. महापालिकेच्या आगामी निवडणूकीनंतरच्या पहिल्या सभेपर्यंत डॉ. बलकवडे यांची मुदत वाढविण्यात आली. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी पाठविलेल्या पत्रात प्रशासक पदासाठी कोणताही कालावधी दिलेला नाही. परिणामी महापालिका निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचेच स्पष्ट होते. त्यामुळे इच्छुकांच्या आकांक्षेवर पाणी फिरले आहे.
संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड-१९ च्या राज्यात होत असलेल्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या निवडणूका स्थगित केल्या होत्या.
राज्य शासनाने तेथे प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती केली आहे. काही प्रशासकांचा कालावधी संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासकांचीही मुदत ३० एप्रिलला संपणार होती. परंतू राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी कोविड-१९ च्या प्रार्दूभावामुळे आणखी कालावधी लागणार असल्याचे कळविले आहे. परिणामी डॉ. बलकवडे यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिका सभागृहाची मुदत १६ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूका घेता येत नसल्याने आयुक्त डॉ. बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली. दरम्यानच्या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. २३ फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया रेंगाळली. मे मध्ये महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी माजेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतू कोरोनाचा प्रार्दूभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने निवडणूक यंत्रणेचे काम ठप्प झाले.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधली होती. संपूर्ण शहरात निवडणूकीची धामधूम सुरू होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व सण-उत्सव कॅश केले जात होते. प्रमुख चौकांतून डिजिटल बोर्ड लावले जात होते. अनेकांनी तर पत्रकेही वाटून मतदारांना यंदा संधी देण्यासाठी विनवण्या केल्या. एकुणच निवडणुकीचे रणांगण सुरू झाले होते. परंतू आता प्रशासक डॉ. बलकवडे यांना मुदतवाढ मिळाल्याने निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा