तौतके चक्रीवादळ : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा ; कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड - दैनिक शिवस्वराज्य

तौतके चक्रीवादळ : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा ; कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड


सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वादळाची चाहूल लागली असून, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्यानं घरांसह शेतमालाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला आहे.


दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. शनिवारी सायंकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरने वादळ पुढे सरकत होतं. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

हे चक्रीवादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जाणार असल्याने राज्यात अनेक जिल्ह्याला तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील ५८० रुग्णांना रात्रीतूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या आगमनाआधीच राज्यातील काही जिल्ह्यात वाऱ्याच्या वेग वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसालाही सुरूवात झाली आहे. शनिवारी रात्री मुंबईत पाऊस झाला. तिकडे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झालं आहे. इचलकरंजीत शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. तर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. वारे आणि पावसामुळे पिकांचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर, रत्नागिरी तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर गुहागर व दापोली तालुक्यातही संचारबंदी लागू केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढला आहे.


असा असेल चक्रीवादळाचा मार्ग


तौते चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads