१ मे महाराष्ट्र दिन विशेष ; महाराष्ट्र राज्याबद्दल काही रंजक माहिती
कोरोनाच्या काळोख्या वातावरणात महाराष्ट्राची एकसष्टी साजरी होत आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि सेनापती बापटांनी म्हटल्यानुसार, तो या भारताचा आधार राहिला आहे. तरी वर्तमान महाराष्ट्राकडे पाहताना एक केऑस दिसून येतो; पण मला पक्का विश्वास आहे की, आपल्या वैशिष्ट्यांनी महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल.
कोरोनाने पूर्णपणे काळवंडलेल्या काळामध्ये महाराष्ट्राची एकसष्टी आली आहे. कोरोनाचे संकटच इतके मोठे आहे की, तूर्त या क्षणाला बाकी सर्व गोष्टी झाकोळल्या जाऊन एक कोरोनाच शिल्लक राहतो आणि लोकशाहीतले आपले राजकारण शिल्लक राहते. तेव्हा एकसष्टी साजरी करताना सर्व पक्षीय, राजकीय विचारधारांचे मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय घटक, लोक, समाज यांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना करण्याची गरज आहे. किंबहुना, एकसष्टीनिमित्त हाच आपला संकल्प असला पाहिजे.
1 मे 1960 च्या पुढची 61 वर्षे जर समग्रपणाने विचारात घेतली तर अर्थातच या सहा दशकांमध्ये महाराष्ट्राने खूप मोठी पावले टाकली आणि प्रगतीही मोठी केली आहे. आणखी करता आली असती, असे कधीही म्हणता येणे कायमच शक्य असते; पण मला काही गोष्टी यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या वाटतात.
एक म्हणजे महाराष्ट्राचा केव्हाही विचार करायचा झाला तर मला सेनापती बापटांच्या महाराष्ट्राचे वर्णन करणार्या चार ओळी आठवतात आणि त्या अत्यंत पक्क्या, मार्मिक आणि चपखल आहेत.
'महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधिनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा...'
सरलेल्या 61 वर्षांमध्ये याची प्रचिती अनेकदा आली आहे. 1962 मध्ये चीनच्या आक्रमणानंतर त्यावेळी पंडित नेहरूंना देश सावरायला, लष्कराचे नीतिधैर्य सावरायलाही यशवंतराव चव्हाण आठवले; तिथंपासून ते आजचा महाराष्ट्रही ज्यामध्ये जिवंतपणा आहे, कर्तृत्व आहे, असा हा 'महाराष्ट्र आधार या भारताचा...'
अगदी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, सांस्कृतिक जगत, ज्ञानविज्ञानाचे, विज्ञान तंत्रज्ञानाचे जगत, उद्योग-व्यवसाय या सर्वांमध्ये हा महाराष्ट्र 61 वर्षे आघाडीवर आहे आणि त्या अर्थानेच तो या भारताचा आधार राहिला आहे.
मला महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य जे कायम वाटत आले आहे, तेही या 61 वर्षांमध्ये कायम टिकून आहे. ते म्हणजे, महाराष्ट्र नेहमीच संपूर्ण देशाचा विचार करतो. मी ज्याला महाराष्ट्राचे 'जेनेटिक कोड' म्हणतो ते म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा म्हणजे अवघे विश्वची माझे घर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना ज्या कार्याला लावले ते म्हणजे हिंदवी स्वराज्य अर्थात देशासाठी लढायचे. त्या काळात तलवारीने लढायचे होते; पण आज लेखणीनं लढायचंय, जिभेनं लढायचंय, बुद्धिमत्तेनं लढायचंय... असा महाराष्ट्र जीवनाच्या सर्व पातळ्यांना निश्चितपणे देशासाठी लढताना दिसतो. अगदी हा जुळून आलेला योग आहे की, महाराष्ट्राची एकसष्ट वर्षे होत असताना देशाचा सरसेनापतीदेखील एक मराठी व्यक्ती आहे आणि तो सेनेला नेतृत्व देतो आहे, भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे. असा हा अखिल भारतीय विचार करणारा महाराष्ट्र.
त्यानंतरचे मला वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे, देशाला दिशा दाखविणारा महाराष्ट्र. गेल्या 61 वर्षांमध्ये खूप वेळा अशा आहेत की, जेव्हा मूलभूत विषयांमध्ये महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. शासन-प्रशासनापासून रोजगार हमी योजना, महिला आयोग, महिला धोरण, स्वतःच्या इच्छेने पहिल्यांदा लोकपालाची नेमणूक करणे म्हणजे उपलोकायुक्त नेमणे, एक्स्प्रेस हायवे असे कितीतरी निर्णय सांगता येतील जे प्रथम महाराष्ट्राने घेतले आणि नंतर देशाने त्याचे अनुकरण केले!
याखेरीज महाराष्ट्राचे आणखी एक वैशिष्ट्य मला नेहमीच जाणवते. स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधीजींनी महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हटले होते की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. महाराष्ट्राचे हे सामाजिक, सांस्कृतिक वैभव आजही टिकून आहे. अगदी शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळ इथंपासून ते अलीकडील काळात होऊन गेलेली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलने असूद्या किंवा जनलोकपाल मागणारी चळवळ असूद्या; महाराष्ट्राने देशाला नेतृत्व पुरवले. डॉ. अभय बंग, राणी बंग, आमटे परिवार, दाभोळकर परिवार, पोपटराव पवार, सिंधुताई सपकाळ, राही पोपेरे यांसारखी चळवळी व्यक्तिमत्वं गावागावांमध्ये आहेत. त्यातील काहीजण प्रसिद्धीच्या झोतात आल्याने समाजाला माहीत आहेत; पण निरपेक्ष भावनेने, निःस्वार्थपणाने समाजाची सेवा करणारे कार्यकर्ते या महाराष्ट्रात उदंड प्रमाणात आहेत. स्री चळवळ, बालकांच्या हक्कासाठीची चळवळ अशा अनेक चळवळींची उदाहरणेही सांगता येतील; जी महाराष्ट्रात सुरू होऊन पुढे देशपातळीवर पोहोचली आणि त्यांनी देशावर प्रभाव पाडला. हेही एकसष्ट वर्षांतल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्यच आहे. मला असे दिसते की, आजचा महाराष्ट्रही व्हायब्रंट आहे, ज्यामध्ये कर्तृत्वाची स्पंदने आहेत असे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आहे. अगदी राजकारणातील उजवे, डावे, मध्यममार्गी यांच्यापासून कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, समाजकारण, अर्थकारण, उद्योग-व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी प्रतिभा झळकते आहे आणि नवी दिशा दाखवते आहे. अलीकडेच आपल्यातून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेल्या सुमित्रा भावेंची यानिमित्ताने आठवण होते. चित्रपट हे माध्यम एक सामाजिक जागृतीचे म्हणून कसे असू शकते आणि तरी ती कला कशी असामान्य पातळीची असू शकते हे दादासाहेब फाळकेंपासून सुमित्रा भावेंपर्यंत अनेकांनी दाखवून दिले. असे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दाखविता येईल.असे असले तरी वर्तमान महाराष्ट्राकडे पाहताना माझ्या मनामध्ये एक काळजी भरून येते. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे याविषयी माझ्या मनामध्ये सूतराम शंका नाही. अगदी आताच्या कोरोनाच्या संकटावरही आपण अगदी लवकरच मात करू याविषयीही शंका नाही; पण आधी मी महाराष्ट्राची जी सर्व वैशिष्ट्ये सांगितली ती आजच्या तारखेला काळजीत पाडतील अशी आहेत. भारताचे भवितव्य उज्ज्वल असले तरी त्यात महाराष्ट्राचा वाटा कसा असेल याबद्दल माझ्या मनात काळजी आहे. कारण पक्षनिरपेक्षपणाने जरी महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाकडे पाहिले तर त्याचे वर्णन 'केऑस' असे करावे लागेल.
देशाचा प्रवास करताना, देशाची स्थिती पाहताना आणि माझ्यापरीने अगदी थोडेसे काम करताना आणखी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे, जातीय स्तरावर महाराष्ट्र फुटत चालला आहे. एक कार्यकर्ता म्हणून सत्तरीच्या दशकामध्ये देशभर प्रवास चालू करताना उत्तर भारतामध्ये, हिंदी बेल्टमध्ये कुणालाही भेटलो की, उशिरात उशिरा दुसरा प्रश्न यायचा 'कौन जात?' मला धक्का बसायचा. त्याच वेळी अभिमानही वाटायचा की, आपण अशा महाराष्ट्रातून येतो जिथे सर्व प्रकारच्या जातीपाती विसरून एक समरस, समान समाज घडविण्याचे आपण वारसदार आहोत. बाळशास्री जांभेकरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची परंपरा पुढेही अनेक काळ सुरू राहिली; पण बघता बघता या महाराष्ट्रात आज जातीय लढे, संघर्ष सरू झालेले दिसताहेत. माणसांच्या जाणिवा जातीय पद्धतीने व्यक्त होताहेत आणि त्याचे कोणालाही काहीही वाटत नाही, ही गोष्ट मला काळजीची वाटते. अर्थात पूर्ण वाटचालीमध्ये अशा प्रकारचे चढउतार चालू असायचेच; पण मला पक्का विश्वास आहे की, मी सुरुवातीला महाराष्ट्राची जी ठळक वैशिष्ट्ये सांगितली, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा