महाराष्ट्र
'झाडे कुजवा' : खेड पंचायत समितीचा नवीन उपक्रम
राकेश कोळी उपसंपादक :-
खेड तालुका पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराचा आणि हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे पर्यावरण मंत्र्यांच्या वाढदिनानिमित्त दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद वाक्य घेऊन संपूर्ण मतदार संघामध्ये अडीच हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या खेड पंचायत समितीतील कृषी विभागाने मात्र झाडे आणा आणि झाडे कुजवा ही नवीन मोहीम राबवली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाने तब्बल 2 हजार झाडे खेड पंचायत समितीला उपलब्ध करून दिली होती. मात्र ही झाडे ग्रामपंचायतींना देण्याची किंवा ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या कृषी विभागाने पूर्णपणे झटकलेली पाहायला मिळत आहे. खेड पंचायत समितीच्या आवारात जवळपास 500 हुन अधिक झाडे ही बेवारस स्थितीत कुजून गेल्याचे निदर्शनास आले आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत पत्रकारांनी गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतची विचारणा केल्यानंतर कुजलेली झाडे बाजूला काढून चांगली रोपे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू केले. परंतु ही झाडे ग्रामपंचायतींनी पंचायत समितीतून का नेली नाहीत, ही झाडे व्यवस्थित न ठेवता ती कुजून गेली तरी त्याकडे कृषी विभागाने त्याकडे लक्ष का दिले नाही असे अनेक प्रश्न हे मात्र यावेळी अनुत्तरीतच राहिले आहेत. याबाबत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जाधव तसेच कृषी विस्तार अधिकारी राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. दरम्यान आणखी एका धक्कादायक प्रकारची देखील सध्या पंचायत समितीमध्ये चर्चा होत आहे. एका जिल्हा परिषद सदस्याने आपल्या मतदार संघात वृक्षारोपणासाठी एक हजार झाडे बाजूला काढायला सांगितल्याची चर्चा जोर धरत आहे. संपूर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना मिळून २ हजार झाडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध झालेली असताना संबंधित जिल्हा परिषद सदस्याने स्वतःच्या मतदार संघासाठी १ हजार झाडे कोणत्या नियमातून बाजूला ठेवायला सांगितली, हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर एक हजार झाडे एकाच जिल्हा परिषद गटासाठी वाटली गेली तर तालुक्यातील अन्य जिल्हा परिषद गटांमध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतींवर हा अन्याय नाही का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. एकूणच शासन स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश जनतेला दिला जात असतानाच खेड पंचायत समितीच्या कृषी विभागाने मात्र झाडे आणा आणि ती जागेवरच कुजवा हा उपक्रम प्रत्यक्षात राबवून शासनाच्या धोरणाला काळिमा फासण्याचे काम केले आहे. संबंधित कृषी अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांवर या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा