वडूजचा वृत्तपत्र विक्रेता सामाजिक बांधिलकीसाठी 29 व्या रक्तदानासाठी सज्ज - दैनिक शिवस्वराज्य

वडूजचा वृत्तपत्र विक्रेता सामाजिक बांधिलकीसाठी 29 व्या रक्तदानासाठी सज्ज


प्रतिनिधी : रविना यादव :-

हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. आता त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते सुयोग विजय शेटे यांनी 39 व्या वर्षी  29  वेळी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिसरातील इतर सहकार्‍यांना ही रक्तदानासाठी विनंती करीत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी आई सौ. शोभा शेटे यांच्या शस्त्रक्रिया वेळी ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. त्यावेळी त्या गटाचे रक्त मिळवण्यासाठी खूपच धावपळ उडाली होती. याची जाणीव ठेवून वयाच्या 24 व्या वर्षी सातारा येथे जाऊन प्रथम रक्तदान केले होते. त्याबदल्यात आवश्यक रक्त गट उपलब्ध झाला होता. तेव्हापासून आता पर्यंत रक्तदान शिबीर, शिवजयंती व इतर वेळी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे. 
रक्तदानामुळे मानसिक समाधान मिळते, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. शारीरिक क्षमता वाढते, नवीन ऊर्जा निर्माण होते. गरजवंतांना रक्त दिल्याचे पुण्य लाभते, अशी त्यांची धारणा आहे. खटाव तालुक्यातील वडूज बसस्थानकामधील प्रवेशद्वार नजिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक  वसंतराव शेटे यांनी 1957 साली  वृत्तपत्र वितरण करण्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी मराठा, केसरी, तरुण भारत व इतर वृत्तपत्र वाचकांच्या पर्यंत पोहचविले जात होते. आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात स्थिरावली आहे. वडूज नगरीत मंगळवारी रक्तदान शिबीराचे खटाव पंचायत समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले असून त्यासाठी श्री सुयोग शेटे हे 29 व्या वेळी रक्तदान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 400 ते 500 मिली एका वेळी रक्तदान केले जाते. आता पर्यंत 10 ते 12 लिटर रक्तदान केले असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. वृत्तपत्र वितरण व विक्री करून सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सुयोग शेटे यांचे वृत्तपत्र मालक, मुद्रक, संपादक व पत्रकारांनीही अभिनंदन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads