सोलापूरचा मार्शल लॉ इतिहास आता पडद्यावर सोलापूर सोशल फौंडेशनच्या पुढाकारातून वेब सिरीजची निर्मिती होणार - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूरचा मार्शल लॉ इतिहास आता पडद्यावर सोलापूर सोशल फौंडेशनच्या पुढाकारातून वेब सिरीजची निर्मिती होणार


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

 सोलापूर :  सोलापूरच्या मार्शल लॉ वर आधारित असलेला इतिहास आता  पडद्यावर येणार असून सोलापूर सोशल फौंडेशनच्या पुढाकारातून यावर आधारित वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 भारताला स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे आणि तिथून स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवाला सुरूवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आता  सोलापूर सोशल फौंडेशन सोलापूरच्या मार्शल लॉ चा इतिहास पडद्यावर प्रत्यक्षरूपात साकारणार आहे. याबाबत बोलताना सोलापूकर म्हणाले की, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सोलापूरचे स्थान आणि योगदान हे आगळेवेगळे राहिलेले आहे. मात्र या योगदानाविषयी देशवासीयांना जेवढी माहिती असायला पाहिजे तेवढी ती नाही म्हणून अमृतमहोत्सवाचा योग साधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज तयार केली जाणार आहे. यात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सोलापूरचे योगदान किती आणि कसे आहे, यावर प्रकाश टाकला जाणार आहे. यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार आहे.  या योगदनाविषयीचा अधिकृत इतिहास संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक टीम पुढील तीन चार दिवस सोलापुरात  इतिहासाबाबत माहिती घेणार आहे.  मात्र यासाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज, पुस्तके, पत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे अजूनही सर्वत्र विखुरलेली आहेत. अशा प्रकारचे पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनी या मालिकेसाठी ती द्यावीत, जेणेकरून खरा इतिहास सर्व प्रेक्षकांसमोर मांडताना सोपे जाणार आहे. हे दस्ताऐवज देणार्‍या लोकांकडून त्यांच्या प्रति करून घेतल्या जातील आणि मूळ दस्ताऐवज त्यांच्याकडेच राहतील.      ज्यांच्याकडे असे दस्ताऐवज असतील किंवा ज्यांना अशा पुराव्याची, दस्ताऐवजांची माहिती असेल त्यांनी  विपुल लावंड ( 7767080999) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सोलापूकर म्हणाले.  या पत्रकार परिषदेला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,  संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक  आदींची उपस्थिती होती.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads