राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त प्रवेशिका येण्यासाठी प्रयत्न करा :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त प्रवेशिका येण्यासाठी प्रयत्न करा :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी                                           सोलापूर, दि. २३  : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य" ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रवेशिका येण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेच्या प्रचार व प्रसिद्धीबाबत राज्याचा ऑनलाईन आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार वाकडे उपस्थित होते.

श्री. देशपांडे यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), एनसीसी समन्वयक असतात, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. प्राचार्य आणि समन्वयक यांच्या बैठका घेऊन चांगल्या दर्जाच्या प्रवेशिका येण्यासाठी प्रयत्न करा. प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडीओ मेकिंग आणि भीत्तीचित्र स्पर्धा अशा कोणत्याही स्पर्धेत विद्यार्थी, नागरिक, शासकीय आणि खासगी अधिकारी-कर्मचारी, शेतकरी, पत्रकार, शिक्षक भाग घेतील, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक बीएलओ यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक कामाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू करा. ही महत्वाकांक्षी स्पर्धा असून जनजागृतीसह स्पर्धकांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक कार्यालयातून १० प्रवेशिकेसाठी प्रयत्न
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, स्पर्धेबाबतची माहिती सर्व समाज माध्यमातून प्रसिद्धी केली. वेबिनारच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७८ महाविद्यालयाचे प्राचार्य, एनएसएस समन्वयक यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. प्रवेशिकेसाठी पाठपुरावा बैठक घेणार आहोत. प्रसिध्द गायक आनंद शिंदे, हास्यसम्राट दीपक देशपांडे आणि गिर्यारोहक आनंद बनसोडे यांचे रेकॉर्डिंग करून सोशल मीडिया, आकाशवाणी यावर आवाहन करण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व कार्यालयातून १० प्रवेशिका येण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ ला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात. तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads