राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये दहा हजार पदभरती सुरू - दैनिक शिवस्वराज्य

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये दहा हजार पदभरती सुरू

जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण 10 हजार 127 रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्‍त झालेले असून, यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावरच घेण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96 पदे, आरोग्यसेवक (पुरुष) याची 3,184 पदे आणि आरोग्यसेविकांची 6,476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्‍त पदे भरण्यात येणार आहेत.

मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण 4 लाख 2 हजार 12 अर्ज प्राप्‍त झाले असून, या अर्जांद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले आहेत.

आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हा परिषदा आणि जिल्हा पंचायत समित्यांसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्‍तस्तरावर आढावा घेण्यासंदर्भात ग्रामविकासमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पद भरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads