महाराष्ट्र
ग्रामविकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन
सोलापूर,दि.13 : राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. ग्रामविकासाच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे अमृत महोत्सवानिमित्त आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. समारंभाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधिन शेळकंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यातूनच एक आदर्श गाव तयार होऊन आदर्श ग्रामपंचायती तयार होत आहेत. गावच्या प्रगतीसाठी सरपंच, ग्रामसेवक यांना महत्व आहे. त्यांनी विविध योजना गावात राबवून विकास करावा. कोणतेही काम पारदर्शिपणे केले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. जिल्हा परिषदेने कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण तसेच विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. त्यामध्ये माझे गाव कोरोनामुक्त गाव' ही जिल्ह्याची योजना महाराष्ट्रात राबविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळाला म्हणून तेथेच न थांबता आणखी जोमाने काम करावे. प्रत्येक नागरिकाने ग्राम विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव जाधव, वैशाली सातेपुते, सुमन नेहतराव, बळीराम साठे, डॉ.निशिगंधा माळी, जयमाला गायकवाड, शिवानंद पाटील, अनिरुद्ध कांबळे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भूषविलेल्या पुष्पमाला जाधव यांचा पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने त्या योजनेंतर्गत चांगले काम करुन योजनेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तालुकास्तरीयमध्ये अक्कलकोट-भुरी कवठे, बार्शी-यावली, करमाळा-सरपडोह, माढा- जामगाव, पंढरपूर-पुळूज, मंगळवेढा-लवंगी, मोहोळ-पापरी, उत्तर सोलापूर-मार्डी, सांगोला-अकोला, दक्षिण सोलापूर-होटगी. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यामधील यशस्वी रित्या काम केलेल्या ग्रामसेवकांना सन 2017-2018 ते 2020-2021 या कालावधीतील 44 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांनी आदर्श काम करावे, ग्रामीण खेडी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा