महाराष्ट्र
भाव माझ्या अंतरीचे..!(पुष्प 34 वे ) संविधान दिनानिमित्ताने....
समता, बंधुता, न्याय, समानता
जनतेचा सर्वस्वी विचार
अंतर्भूत ही धर्मनिरपेक्षता
अभिव्यक्तीलाही मुक्त संचार...
आपल्या संविधानाचे महत्व सांगणाऱ्या या चार ओळी आहेत. तसं पाहिलं तर कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही, की ते आपल्या देशाच्या संविधानाचं वर्णन करू शकतील. संविधानातील एका शब्दात अनेक शतकांचा इतिहास सामावलेला आहे. संविधानात कलम १५ मध्ये लिहिलेलं आहे की, राज्य, धर्म, जात, लिंग, वंश आणि जन्माचे ठिकाण यावरून कोणताही भेदभाव करणार नाही. या एका वाक्याने देशात क्रांती घडवली आहे. इतिहास बदलला आहे आणि नवीन निर्माणही केला आहे. ज्या ग्रंथावर संपूर्ण देश चालतो आहे. त्या संविधानाचा आज संविधान दिन आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या संविधान सभेने संविधानाचा मसुदा अंगिकारला. आजही ज्यावेळी आपण संविधानाची उद्देशिका वाचतो त्यावेळी म्हणतो, २६ नोव्हेंबर १९४९ ला आम्ही हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत. २६ नोव्हेंबरला संविधान सभेने अनेक चर्चेनंतर, वाद- विवादानंतर या संविधानाचा अंगीकार केला तर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू केलं. आपल्या देशात २६ जानेवारी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण संविधान दिन हा आता साजरा केला जाऊ लागला आहे.
२०१५ साली घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती होती. त्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सरकार तर्फे वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जात होते. त्यावर्षीचं २६ नोव्हेंबरला संविधान दिन अधिकृतरीत्या पहिल्यांदा साजरा केला गेला. तेव्हापासून भारतात दरवर्षी संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे. आपल्या देशातील संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे संविधान लिहिण्यासाठी २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस लागले. या काळात १६६ वेळा संविधानाच्या वेगवेगळ्या विषयावर गंभीरआणि सखोल चर्चा झाली. या चर्चेवर राज्यसभा टीव्हीने खूप चांगला कार्यक्रम बनवला आहे, तो पहायला हवा. एका - एका शब्दावर अनेक तास चर्चा करण्यात आलेली आहे. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कशी करावी असा एक मुद्दा उपस्थित केला गेला. यावर एच व्ही कामत यांनी “आम्ही हे संविधान देवाला समर्पित करीत आहोत.” अशी सुरुवात करावी असा प्रस्ताव मांडला. यावर देवी कामाख्याचे भक्त असलेले रोहिणीकुमार चौधरी यांनी “आम्ही हे संविधान देवीप्रती समर्पित करतो,” असं म्हटलं आणि सभेत एकच हशा पिकला. त्यावरही खूप मोठी चर्चा झाली आणि शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले “आपला देश हा अनेक धर्मांनी, जातींनी, संस्कृतींनी बनलेला आहे. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा आहे. आपल्या देशात असेही लोकं राहतात, ज्यांचा कोणताही ईश्वर नाहीये. असं लिहिणं म्हणजे अनेक लोकांवर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात काय करावं, हे त्यांनी ठरवावं पण संविधानात असं लिहिता कामा नये. आपलं संविधान हे सर्वसमावेशक असायला हवं. त्यामुळे आपल्या संविधानात कोणत्याही एका विशेष धर्माचा उल्लेख नाही, अठरापगड जाती, धर्म, पंथ, विविध विचारसरणी असलेल्या तत्कालीन शंभर कोटी जनतेला एका सूत्रात बांधणारे भारताचे संविधान आपल्यासाठी नेहमीच आदरणीय आणि पथदर्शक असलं पाहिजे.
आपला देश संविधानावर चालतो पण अजूनही बहुसंख्य लोकांना संविधानात काय आहे ? याची माहिती नाही. घरा - घरात बाबा - बुवांचे मंत्र पोहचले पण संविधानाची कलमं पोहचली नाहीत. घरात प्रत्येकाचे धर्म ग्रंथ असतात पण आपल्याला सर्व अधिकार देणारे संविधान मात्र नसते. संविधान आपल्याला आपले मुलभूत अधिकार काय आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य उपभोगताना इतरांना त्रास दिला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचे सर्व विवेचन केले आहे. आपणां सर्वांना ७४ व्या संविधानदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रा. अभिजीत भंडारे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा