जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिवरी दिगर व वाकोद पूरग्रस्त भागाची केली पाहणी; आवश्यक ती पावले उचलण्याचे दिले निर्देश
जामनेर, दि. २ (जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी आज हिवरी दिगर आणि वाकोद या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. या पाहणीच्या दरम्यान त्यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि नुकसानग्रस्तांचे हाल जाणून घेतले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यांनी पूरग्रस्तांचे पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि ज्या नागरिकांचे घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना तात्काळ मदत मिळावी याची खात्री करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. या पाहणी दरम्यान, तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस निरीक्षक सचिन सानप ,ग्रामस्थ, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा