पाळधीला एसटी महामंडळाच्या बसला थांबा द्या...ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
जामनेर तालुक्यातील पाळधी गावात एस.टी. महामंडळाच्या जलद आणि अति जलद बस थांबण्यासाठी योग्य थांबा असूनही, बस थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पाळधी ग्रामस्थांनी नुकतेच विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना निवेदन दिले आहे.यावेळी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम महाजन यांच्या सहकार्याने विभाग नियंत्रकांची भेट घेण्यात आली. निवेदन देताना पाळधी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांची त्रासदायक स्थिती
पाळधी गाव छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर असून, यापूर्वीपासून जलद व अति जलद गाड्यांना येथे थांबा आहे. मात्र, वाहक व चालकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, तसेच शालेय शिक्षणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या तरुण-तरुणींना रोज अपमान सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. अनेकदा एसटीत चढू देत नाहीत, आणि चढलेच तर जळगाव बाहेर कुठेही बस थांबवून बळजबरीने उतरवून दिले जाते.
रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र शासनाचा ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ हा नारा पाळधीत लागू पडत नाही, कारण बस गाडीला आडवे झाल्यावरही चालक बस थांबवत नाही. या समस्येचे गांभीर्य जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी घ्यावे, अन्यथा ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे.
याबाबत, विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी तात्काळ पाळधी गावासाठी १५ दिवसांसाठी एक व्यक्ती कंट्रोल म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बस स्थानक परिसरात फलक बसविण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.निवेदन देताना ईश्वर चोरडिया, संजय शेळके, कैलास परदेशी, विठ्ठल माळी, संतोष पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Previous article
Next article
Good👍
उत्तर द्याहटवा