जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी.. नुकसानभरपाईचा दिला दिलासा
जामनेर, दि. २ जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, हिवरीदिगर, आणि पहुर गावात अजिंठा येथून उगम पावणाऱ्या वाघुर नदीला अचानक आलेल्या पुरामुळे आज सकाळी आठ वाजता अतिक्रमित नदीपात्रातील दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी घुसले. या पुरामुळे अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या.
वाघुर नदीने अनेक वर्षांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढून पहुर पेठ गावातील अतिक्रमित जागांवर असलेल्या दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे पहुर पेठ येथील बस स्टँडकडे जाणाऱ्या बाजारपेठेचा तुफान पाण्यामुळे तब्बल दोन तास बंद होता. आज सर्जा राजाचा पोळा सण असल्याने बाजारपेठेत असलेल्या मरीआईला नैवेद्यासाठी अनेक महिला गोळा झाल्या होत्या. परंतु, अचानक आलेल्या पुरामुळे त्यांची धांदल उडाली. बस स्टँडकडे जाण्याचा महामार्ग बंद झाल्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतीच्या काही सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे नदीकाठच्या बाजारपट्ट्यात ठराविक रक्कम भरून दुकाने व घरे बांधण्याची परवानगी मिळाली होती. यामुळे अतिक्रमण वाढले आणि पहुर पेठ गावात जाण्यासाठीचा रस्ता बंद झाला.
जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदारांनी असेही सांगितले की, अतिक्रमित जागांवरील दुकाने आणि घरे मालकांना नोटिसा दिल्या जातील. या पाहणी दरम्यान सरपंच अबु तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, शिवसेना उपसंघटक व पत्रकार गणेश पांढरे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवरीदिगर गावातील वाहून गेलेल्या घरांची पाहणी तहसीलदार नानासाहेब आगळे, जे.के. चव्हाण, अतिश झाल्टे,राजधर पांढरे, चंद्रकांत बाविस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पांढरे, शिवसेना उपसंघटक व पत्रकार गणेश पांढरे, वासुदेव घोंगडे आणि गावकऱ्यांनी केली. तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करून सर्वांना नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा