महाराष्ट्र
सोलापूर विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण.... सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार : - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी खासदार डॉक्टर जयासिध्देश्र्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसायीक, उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे. सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे. तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत.
देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे. यामुळे सोलापूर मध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची सुरूवात श्रीमद्ववीरशैव गुरूकुल होटगी मठ मधील विद्यार्थ्यांनी गणेश वंदन करून व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमानतळ संचालक सी.एन.वंजारा यांनी केले तर आभार प्रदर्शन विमानतळ व्यवस्थापक चंपला बा यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा