गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई...माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस
जामनेर: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कार्यशाळा आयोजित, गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर विषयी माहिती दिल्यास एक लाखाचे बक्षीस
सविस्तर वृत
जामनेर तालुक्यात मुलींच्या संख्येत घट दिसून आली असून हजार मुलांमागे केवळ ८४५ मुली आढळून आल्या आहेत. या चिंताजनक स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पंचायत समिती सभागृहात आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यासाठी स्त्री भ्रूणहत्येविरोधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत पी.सी.पी.एन.डी.टी.च्या सदस्य डॉ. नम्रता अच्छा आणि कायदेशीर सल्लागार अॅड. शुभांगी चौधरी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पल्लवी राऊत आणि आशा कुयटे यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात चौधरी यांनी माहिती दिली की, गर्भलिंग निदान करणाऱ्या कोणत्याही केंद्र, डॉक्टर किंवा व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. तक्रार १८००२३३४४७५ या क्रमांकावर किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर नोंदवता येईल.डॉ. अच्छा यांनी उपस्थित आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे समुपदेशन करून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शपथ घेतली. या प्रसंगी विविध चित्रफितीद्वारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर नीलिमा गवळी यांनी आभार व्यक्त केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा