मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर निर्बंध: ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे आवाहन
दि. 18 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दसरा, दिवाळी तसेच इतर सणांच्या काळात मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, ध्वनी आणि हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या संभाव्य हानिकारक परिणामांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठरावीक मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री, आणि वापरावर बंदी घातली आहे.
पर्यावरण (संरक्षण) नियम, 1986 नुसार फटाक्यांचे आवाज 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबलपेक्षा अधिक असू नये. साखळी फटाक्यांच्या बाबतीत ही मर्यादा अनुक्रमे 150, 110, आणि 105 डेसीबल एवढी आहे. यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके आणि 100 पेक्षा जास्त फटाक्यांचा समावेश असलेले साखळी फटाके यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
फटाके वाजविण्याचा वेळ सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत मर्यादित करण्यात आला आहे. रात्री 10 नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके वाजविण्यास मनाई आहे. यासोबतच रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्याभोवतालच्या 100 मीटर अंतरात येणाऱ्या शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके वाजविण्यावर पूर्णपणे बंदी आहे.राज्यातील शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी आणि हवा प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांत या नियमांचे पालन करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक प्रसारमाध्यमांतून जनतेत या नियमांची माहिती पोहोचवली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल आणि अशा फटाक्यांची जप्ती केली जाईल.दिवाळीचा आनंद साजरा करताना योग्य ती दक्षता घेऊन फटाक्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, पाचोरा यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा