जामनेरात नकली गावठी बंदूक व सुरासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी केली अटक – नागरिकांमध्ये खळबळ
जामनेरच्या शास्त्री नगर भागात गजानन महाराज मंदिराजवळ एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला (नकली) गावठी बंदूक आणि चाकूसह अटक करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त
काल रात्री 30 डिसेंबर सुमारे नऊच्या सुमारास गजानन महाराज मंदिर परिसरात एका तरुणाला तोंड बांधून संशयास्पद रितीने फिरताना काही नागरिकांनी पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी त्याला रोखून चौकशी केली असता, त्याच्या कमरेजवळ (नकली) गावठी बनावटीची बंदूक व चाकू (सुरा) सापडला. यानंतर नागरिकांनी तातडीने जामनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी त्वरित पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडील शस्त्रसामग्री जप्त केली. सदर मुलास जामनेर पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.घटनेनंतर शहरात अनेक प्रकारच्या अफवा पसरू लागल्या आहेत. मात्र, या संदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी व सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले आहे.सध्या पोलिसांकडून अल्पवयीन मुलावर योग्य ती कारवाई करण्यात येत असून, या घटनेमागील उद्देश स्पष्ट करण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारांच्या घटना तत्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा