नाचनखेडा येथे वन्य प्राण्यांचा हल्ला: 6 बकऱ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..
जामनेर तालुक्यातील नाचनखेडा येथे 17 तारखेला रात्री एक दुर्दैवी घटना घडली. रामेश्वर जगन्नाथ भोई यांच्या लाखोली चौकातील राहत्या घराजवळील बकऱ्या बांधण्यासाठी केलेल्या शेडमध्ये 9 बकऱ्यांपैकी 6 बकऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झाल्या आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भैया मावसकर यांच्या शेजारील जागेत असलेल्या शेडमध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या. नेमके कोणी या बकऱ्यांवर हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, हल्ला कुत्र्यांनी केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. मात्र, गावातील काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हल्ला लांडग्यांनी केला असावा, तर काहींच्या मते हा बिबट्याचा हल्ला असू शकतो.घटना गावाच्या वस्तीच्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी वनविभागाला घटनेचा अधिक तपास करण्याची विनंती केली आहे. संबंधित वन्य प्राणी कोणता आहे, याचा लवकरच शोध घेण्याची गरज आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत.वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेनंतर पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा