विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा - मंत्री गुलाबराव पाटील - दैनिक शिवस्वराज्य

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा - मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव दि. १८  विज्ञान प्रदर्शन हा केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील विचारसरणी अंगी कारावी, जे जमते त्यावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या कल्पनांना कृतीत उतरवून विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात करण्यात त्याप्रसंगी बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन पार पडले. 
कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांनी श्री सरस्वती पूजन , दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर विविध शालेय खेळ व प्रयोगात्मक प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाची गोडी उपस्थितांना चाखवली. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशीलतेला उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, "जिल्हा स्तरीय प्रदर्शन हे सुरुवातमानून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. "जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याचे आवाहन केले. खुद पर भरोसा रखो, हर मुश्किल आसान होगी, आज जो मेहनत करोगे, कल वही पहचान होगी। या शेर शायरी ने मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरुवात केलीं.

यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, मोबाईलचा वापर केवळ गरजेसाठीच करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलला मित्र मानण्याऐवजी आपले खरे मित्र म्हणजे शिक्षक आणि पालक असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांनीं आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले शिक्षण आणि व्यक्तिमत्वविकास साधावा, पण मोबाईलचा अतिवापर मात्र टाळावा. "आई-वडील यांची सेवा करा. आपल्या जीवनाचा तेच खरा आधार असून, त्यांच्यासोबतचा स्नेह आणि संवादच आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जाईल."

यावेळी डायटचे प्राचार्य अनिल झोपे, जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ई. आर. शेख, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिणी चव्हाण, गट विकास अधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन. एफ. चौधरी, जिल्हा शिक्षक सेनेचे नरेंद्र सपकाळे, रविंद्र चव्हाण सर, ज्ञानेश्वर सोनवणे, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. धाडी, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळचे अध्यक्ष किशोर राजे, सचिव सुनील वानखेडे, उपाध्यक्ष एस. डी. पाटील, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, शालेय व्यवस्थापन समिती व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव आदींचे या समारंभाला उपस्थित होते.

जिल्हा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग

शिक्षकांचे साहित्य प्रदर्शन : शिक्षकांचे शैक्षणिक मॉडेल प्राथमिक १५, माध्यमिक १५, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य मॉडेल - माध्यमिक - ४५ प्राथमिक ४५, शैक्षणिक साहित्य मॉडेल प्रयोगशाळा सहाय्यक - १५. शैक्षणिक साहित्य मॉडेल दिव्यांग विद्यार्थी - २. शैक्षणिक साहित्य मॉडेल आदिवासी गट - ६. 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन शोध, प्रयोग व तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण, या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक विचारसरणीला धार देण्याचा उद्देश बाबत माहिती सविस्तरपणे विषद केली . बहारदार सूत्रसंचालन निवेदक हर्षल पाटील यांनी केले. तर आभार विज्ञान पर्यवेक्षक व उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads