पहूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावला चोरीचा छडा—७० हजारांची रक्कम जप्त - दैनिक शिवस्वराज्य

पहूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावला चोरीचा छडा—७० हजारांची रक्कम जप्त

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडलेल्या चोरीच्या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, फिर्यादीच चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहूर पोलीस ठाण्याच्या सतर्क तपासामुळे अवघ्या काही तासांतच हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी संशयितास अटक करून ७०,००० रुपये जप्त केले आहेत.मुंदखेड येथील कैलास शंकर सटाले यांनी पहूर पोलिसात तक्रार दाखल केली होती की, २९ डिसेंबर रोजी सायकलला अडकवलेली पैशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही रक्कम ९६ हजार रुपये होती. कैलास सटाले हे पहूर येथील प्रसिद्ध व्यापारी हर्षद जैन यांच्या किराणा दुकानात गेल्या पाच वर्षांपासून काम करत होते.तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात झाली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर कैलास सटाले यांना विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली.सखोल चौकशीत सटाले यांनी चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिली. स्वतःच्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी ही रक्कम चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ७०,००० रुपये जप्त केले. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.या तपासामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या काही तासांतच सत्य समोर आणले. या वेगवान कारवाईचे परिसरात कौतुक केले जात आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही आर्थिक संकटात असताना कायद्याचे उल्लंघन करू नये. मदतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads