पाचोरा येथे गावठी पिस्टलसह युवक अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई - दैनिक शिवस्वराज्य

पाचोरा येथे गावठी पिस्टलसह युवक अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

पाचोरा शहरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो हे शस्त्र बाळगत असल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाचोरा शहरात गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आश्विन ऊर्फ विशाल पाटील (वय २२, रा. देशमुखवाडी, पाचोरा) हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल बाळगत आहे. अधिक तपास करताना समजले की, तो भारत डेअरी चौफुली येथे येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचून संशयितावर नजर ठेवली.संध्याकाळच्या सुमारास एक संशयित व्यक्ती भारत डेअरी चौफुली जवळ आल्याचे पाहून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता, त्याने स्वतःचे नाव आश्विन ऊर्फ विशाल शंकर पाटील असल्याची कबुली दिली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्टल सापडले. बेकायदेशीर शस्त्र बाळगून शहरात दहशत माजवण्याचा त्याचा हेतू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ८८/२०२५ अन्वये आर्म्स अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, राहुल महाजन, प्रमोद ठाकुर (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी सहभाग घेतला.या कारवाईमुळे पाचोरा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसला आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads