देशभक्त डॉक्टर कृ .भी अंत्रोळीकर यांचा अंत्रोळी येथे अर्ध पुतळा बसवण्यास सरकारची मान्यता..... - दैनिक शिवस्वराज्य

देशभक्त डॉक्टर कृ .भी अंत्रोळीकर यांचा अंत्रोळी येथे अर्ध पुतळा बसवण्यास सरकारची मान्यता.....


समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर कृ. भी. अंत्रोळीकर यांचा भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पुतळा उभारणार होते पण आता तो योग आला आहे. आत्ता लवकरच कृ. भी. अंत्रोळीकर यांचा पुतळा उभारणा असल्याची माहिती सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. 
    1930 साली सोलापूरच्या जनतेने चार दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते आणि भारतात फक्त सोलापूर येथे ब्रिटीशांनी मार्शल लॉं पुकारून संपूर्ण शहर लष्कराच्या ताब्यात दिले होते ! सोलापूर सोडून इतर ठिकाणी तीव्र आंदोलने झाली पण ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात केवळ सोलापूर हे शहर देण्यात आले होते !
     दि. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे चार दिवस सोलापूर स्वतंत्र होते! युथ लीगचे तरुण कार्यकर्ते, कामगार हे सर्व मिळून शहराची सर्व कामे करीत होते, कुठेही गोंधळ नव्हता, रस्त्यावरची वाहतूक सुद्धा स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे नियंत्रित करीत होते. रामकृष्ण जाजू व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. कलेक्टर कचेरीवर, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. फक्त गोरे अधिकारी व पोलिस हे कुठेच दिसत नव्हते !
    गोरे अधिकारी व गोर्‍या सैनिकांचेच लष्कर 12 मे च्या रात्री सोलापूरात पोहोचले आणि मग मात्र शहरात मार्शल लॉं लागू करण्यात आला, संपूर्ण शहर लष्कराने ताब्यात घेतले आणि सगळीकडे ब्रिटिश सानिकांचा नंगा नाच सुरू झाला. घराबाहेर कुणी दिसला की गोळीबार करून त्याला मारले जात होते, अशी अनेक निरपराध माणसे मारली गेली. नागरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला, नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 6 महीने सक्तमजुरी व 10,000 रु. दंड अशी शिक्षा दिली. तुळशीदास जाधव यांना ५ वर्षे सक्तमजुरी व 3000 रु. दंड, 5 वर्षे सक्तमजुरी व 2000 रु. दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. अंत्रोळीकर, भाई छन्नुसिंग चंदेले, जगन्नाथ मास्तर, रामभाऊ राजवाडे, बंकटलाल सोनी आदि अनेक नेत्यांना सक्तमजुरीच्या शिक्षा झाल्या. डॉ. अंत्रोळीकर व भाई चंदेले यांच्या मालमत्ता जब्त करण्यात आल्या. मुख्य म्हणजे मंगळवार पेठ पोलिस चौकी जळीत प्रकरणी व दोन पोलिसांना जाळले बाबत चार लोकांना त्यात गोवण्यात आले, राजद्रोहाचाही गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला ते म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे व पत्रकार असलेले अवघ्या २२ वर्षांचे कुर्बान हुसेन यांच्यावर लष्करी कोर्टात खटला चालविण्याचा फार्स करण्यात आला व या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली! वास्तविक या चारही जणांचा पोलिस चौकी जळीत प्रकरणात प्रत्यक्ष काही संबध नव्हता पण खोटे पुरावे उभे करून फाशीची शिक्षा देण्यात आली. 
    येरवडा तुरुंगात 12 जानेवारी 1931 रोजी या चार हुतात्म्यांना फासावर लटकाविण्यात आले. हे चार हुतात्मे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचेच प्रतीक आहेत. यावेळी सर्व सोलापूर शोक करीत होते. शेकडो वर्षाची परंपरा असलेली सोलापूरतील नंदीध्वजाची - काठ्यांची मिरवणूक 12 जानेवारी 1931 रोजी निघाली नाही! या चार हुतात्म्यांच्या बलिदनामुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकाना प्रेरणा मिळाली. कामगारवर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा ' सोलापूर कम्युन' असे संबोधून गौरव केला आहे! 
      महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. जिथे समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी दारूबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत असे आवाहन गांधींनी केले होते. त्याप्रमाणे सोलापुरात दारू गुत्त्यांसमोर निदर्शने, प्रभात फेर्‍या आदींनी वातावरण ढवळून निघाले होते. म. गांधींना ब्रिटीशांनी 4 मे 1930 रोजी मध्यरात्री सूरतच्या जवळील कोराडी येथे अटक केली, ही बातमी वाऱ्यासारखी सोलापूर येथे आली सोलापुरात 5 मे ला संध्याकाळी पोचली. डाॅ.अंत्रोळीकर हे सोलापुरातील गिरणी कामगारांचे नेते होते.
     राष्ट्रीय गिरणी कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली होती त्यामुळे त्यांनी गिरणी कामगारांना एकत्र करून गांधी यांच्या अटकेचा निषेध करून संप पुकारला होता जवळजवळ 15000 कामगार संपावर गेले होते व त्यांनी सोलापूरचे सर्व यंत्रणा ताब्यात घेतली होती. 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. वातावरण गरम झाले होते. गिरणी कामगार कामावर न जाता निषेध मोर्चांमध्ये सहभागी होत होते.
   असे डॉक्टर कृ. भी. अंत्रोळीकर हे मूळचे मु. पोस्ट अंत्रोळी ता. द. सोलापूर येथील असल्यामुळे गावातील लोकांनी पुतळा उभारण्याचे ठरवले त्याला शासनाने मान्यता ही दिले आहे. त्याचे उद्घाटन लवकरच संपन्न होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads